ठाणे : केंद्रीय मंत्री तसेच भाजप नेते नारायण राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सांगली येथून शनिवारी एकाला अटक केली. प्रवीण पवार (३०) असे त्याचे नाव असून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेल्या ‘युवासेना महाराष्ट्र राज्य’ या फेसबुक खत्यावरून त्याने ही आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात प्रवीण विरोधात आयटी कायद्यासह विविध कलमंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

युवासेना महाराष्ट्र राज्य या फेसबुक खात्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे ठाणे शहर सचिव दत्तात्रय गवस यांना हे मजकूर फेसबूकवर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या मजकुरावरून आमच्या भावना दुखावल्या असल्याचे गवस यांनी पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची दखल घेत नौपाडा पोलिसांनी तपास केला असता हा मजकूर सांगली येथील कडेगाव मधील प्रवीण पवार याने प्रसारित केला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सांगली येथून प्रवीणला ताब्यात घेऊन अटक केली. प्रवीण हा ठाकरे गटाचा पाधाधिकरी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader