ठाणे : येथील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकच्या पथकाने हबीब अजमईन शेख याला रविवारी अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच दोन आरोपींना अटक झालेली असून यातील एका फरारी आरोपीच्या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हबीबला अटक केली आहे.
राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना, त्यांच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आके होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.
हेही वाचा >>>उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट; चार ते पाच कामगार अत्यवस्थ, दोघांची स्थिती चिंताजनक
या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्याच्यासोबत दुचाकीस्वारास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. आरोपी ओसामा शेख हा फरार असून त्याचा आणि मुख्य सुत्रधाराचाही शोध अद्याप लागलेला नाही. ओसामाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाकडून तपास सुरू असून त्या दरम्यान जमील हत्येप्रकरणात हबीब अजमईन शेख (३६, रा. राबोडी) याचा सहभाग असल्याचे पुरक पुरावे पथकाला मिळाले आहेत. त्याआधारे पथकाने त्याला रविवारी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.