ठाणे : मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक केल्यास आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणुक करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्हयात असंख्य गुंतवणुकदार यांनी गुंतवणुक केली असल्याचे तपासात आढळुन येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संख्येत आणि फसवणुक झालेल्या रकमेत खुप मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अजय कृपाशंकर श्रीबस्तक, सलिम चांद सय्यद, मोहमद रजा याकुब खान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यांना न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांचा साथीदार इशाक जुम्मन अन्सारी हा फरार असून पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. या चौघांनी फ्लिप ड्रीम इंडिया एलएलपी फ्लिप ड्रीम इंडिया एक्वा एलएलपी या नावाच्या कंपनीच्या स्थापना केली. या कंपनीद्वारे ते मत्सपालनाचा व्यवसाय करतात असे गुंतवणूकदारांना सांगायचे.

हेही वाचा : तृतीयपंथीयांच्यांही घरी गणेशाची स्थापना ; बदलापुरात २५ वर्षांपासून नित्यनेमाने साजरा होतो उत्सव

तसेच मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे अमिष ते गुंतवणूकदारांना दाखवत होते. अशा प्रकारे त्यांनी १३ गुंतवणुकदारांचे एकुण १ कोटी ७ लाख १५ हजार रुपये ठेवी स्वरूपात स्विकारून त्यांना परतावा आणि मूळ रक्कम दिली नाही. याप्रकरणी एका गुंतवणूकदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : शहाड रेल्वे स्थानकात ‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांची धावत्या मालगाडीखाली आत्महत्यालोकसत्ता टीम

या गुन्ह्याचा समांतर तपास करून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या गुन्हयाचा तपास सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, सुनिल लोखंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिशचंद्र राठोड हे करीत आहेत. ज्या गुंतवणुकदारांनी वरील दोन्ही कंपन्याच्या गुंतवणुक योजनेमध्ये गुंतवणुक केली आहे, त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

अशी होती योजना

मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परताव्याच्या चार योजना होत्या. १ लाख रूपये १२ महिन्यासाठी गुंतवणुक केल्यास १८ हजार रूपये दरमहा परतावा व मुद्दल रक्कम, १ लाख रूपये १८ महिन्याकरीता गुंतवणुक केल्यास त्यावर प्रत्येक १ महिन्यानंतर ११ हजार ११२ रूपये परतावा व मुद्दल रक्कम, बायो फ्लोक योजनेमध्ये २ लाख रूपये २ वर्षाकरीता गुंतवणुक केल्यास ०४ महिन्यानंतर ७६ हजार रुपये ६ वेळा असे ४ लाख ५६ हजार रूपये परतावा व मुद्दल रक्कम व १ लाख रूपये बोनस असे एकुण ५ लाख ५६ हजार रूपये परतावा व मुद्दल रक्कम, १२ व १८ महिन्यांकरीता ठराविक रक्कम गुंतविल्यास तसेच जसे जसे गुंतवणुकदार पिरॅमिडप्रमाणे वाढत जाईल अशा प्रत्येक ठराविक टप्प्यावर गुंतवणुकदार यांना मोबाईल, लॅपटॉप, फॉरेन ट्रिप, बुलेट, मारुती कार, आलिशान कार, १ बी. एच. के घर, २ बी. एच. के घर, बंगलो, ५० लाख रोख रक्कम, १ कोटी रॉयल्टी अशा अशक्यप्राय गुंतवणुक योजना होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader