अंबरनाथ : अंबरनाथ येथील एका रासायनिक कंपनीत शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन आग लागण्याची घटना घडली. या घटनेत पाच कामगार जखमी झाले असून सूर्यकांत जिमात या एक कामगाराचा मृत्यू झाला आहे. कंपनीतील नायट्रिक ऍसिडच्या टाकीतून गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर अग्निशमन दलाच्या विभागाकडून शनिवारी सायंकाळी ही आग पूर्णपणे विझवण्यात आली.
अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात वडोळ एमआयडीसीत ब्लू जेट हेल्थकेअर नावाची कंपनी आहे. या कंपनीत डायनायट्रो बेंझो ट्रायफ्लोराईड नावाचं रसायन तयार केलं जातं. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या कंपनीतील नायट्रिक ऍसिड असलेल्या टाकीतून अचानक गळती होऊ लागली. या नंतर काही वेळातच टाकी कोसळून खाली पडल्याने टाकीचा मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर अंबरनाथ, आनंद नगर आणि उल्हासनगर येथील अग्निशमन दल विभागाने घटनास्थळी धाव घेत सायंकाळी उशिरा ही आग पूर्णपणे विझवण्यात आली.
या दुर्घटनेत पाच कामगार जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. उल्हासनगर येथे राहणारे रघुनाथ दास, पावनराम सुरेश बिद, गौतम जाधव, अंबरनाथ येथील लखविंदर बलदेवसिंग शेरगिल, चेंबूर येथील समीर पार्टे हे कामगार या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. सूर्यकांत जीमात यांचा हा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.