डोंबिवली, ठाकुर्लीतील पान टपरी चालकांवर अचानक छापे मारुन पोलीस दुकानातील प्रतिबंधित गुटखा जप्त करुन दंडात्मक कारवाई करीत असल्याने पान टपरी चालकांनी दुकानातील प्रतिबंधित गुटखा घरी आणून, घरातून त्याची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी पत्रीपुला जवळील एका पान टपरी चालकाकडून प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला होता. शनिवारी टिळकनगर पोलिसांनी ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा भागात दोन टपरी चालकांकडून एकूण एक लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.
हेही वाचा >>> गणेशोत्सवातील निर्माल्य टाकण्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप
टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी ठाकुर्ली, भोईरवाडी, खंबाळपाडा, पत्रीपूल, चोळे, ९० फुटी रस्त्यावरील पान टपरी चालकांवर अचानक छापे मारुन प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या दुकान मालकांना दंड आणि कायदेशीर कारवाई सुरू केल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक टपरी चालक रात्री उशिरापर्यंत पानटपरी सुरू ठेऊन प्रतिबंधित गुटका विक्री करतात. हा गुटखा खरेदीसाठी डोंबिवली, कल्याण, शिळफाटा भागातील अनेक दर्दी रहिवासी तो खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. टिळकनगर पोलिसांनी गेल्या १५ दिवसांपासून ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता परिसरातील पान टपरी चालकांच्या दुकानांची झडती घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
या झडती सत्रामुळे बिथरलेल्या पान टपरी चालकांनी दुकानातील प्रतिबंधित गुटखा, सुगंधित मसाला घरी आणून घरात या प्रतिबंधित वस्तुंचे साठे करुन घरातून विक्री सुरू केली आहे. याची कुणकुण टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे यांना लागताच, त्यांनी आता पान टपरी चालकांची घरे शोधून तेथून प्रतिबंधित गुटखा साठे जप्त करुन पान टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार शाम ढाकणे यांना बबलु श्रीराम गुप्ता (३३, रा. मुकुंद चौधरी चाळ, दत्त मंदिरा जवळ, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व) या पान टपरी चालकाने आपल्या मुकुंद चाळीतील घरात प्रतिबंधित विमल पान मसाला, त्याच्या सोबत मिश्रण करण्याची तंबाखु साठा करुन ठेवला आहे अशी माहिती मिळाली. हवालदार ढाकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी श्रीराम गुप्ताच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्यांना विमल पान मसाला, प्रतिबंधित मिश्रित तंबाखु, सुंगंधी सुपारी असा एकूण ७२ हजार रुपयांचा साठा आढळून आला. ढाकणे यांनी श्रीरामवर घातक अन्न पदार्थ विक्री प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> मुंबई-नाशिक महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ; वाहन चालक जखमी
चोळे गावात कारवाई
ठाकुर्ली पूर्व चोळेगावातील हनुमान मंदिरा जवळील सुरेशचंद चंद्रभुषण पांडे (४२, रा. म्हसोबा चौक, ठाकुर्ली पूर्व) यांने आपल्या पान टपरीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार रामेश्वर राठोड यांना मिळाली होती. त्यांनी खात्री केल्यानंतर सुरेशचंद याच्या टपरीवर शनिवारी छापा टाकला. त्याना प्रतिबंधित गुटख्याचा २६ हजार रुपये किमतीचा साठा आढळला. सुभाषचंद हा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील बदलापूर तहसील हद्दीतील बऱ्हैया गावचा रहिवासी आहे. हवालदार राठोड यांनी सुरेशचंद पांडेवर गुन्हा दाखल केला आहे.
या पान टपरी चालकांनी प्रतिबंधित गुटखा कोठुण खरेदी केला. या गुटख्याची वाहतूक कोण करते याची माहिती घेत आहेत.
भिवंडी गोदामातून साठा
भिवंडी जवळील काही गोदामांमधून रात्रीच्या वेळेत कल्याण, डोंबिवलीतील पान टपरी चालकांना बिस्कीट, गोळ्या, इतर खाद्य पदार्थ वाहून टेम्पो मधून दडवून गुटखा विक्री केला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस अशी चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांचा शोध घेत आहेत.