भिवंडी येथील नागाव भागातील नऊ महिन्यांपूर्वीचा प्रसंग. या भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या कॉलमसाठी खड्डे खणण्यात आलेले. त्यापैकी एका खड्डय़ात एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बघ्यांची गर्दी उसळली. पण मृत तरुण कोणाच्याही ओळखीचा नव्हता. कामगारांनी दिलेल्या वर्दीनंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पंचनामा, जाबजबाब घेण्यात आले.
मृताची ओळख पटायला पोलिसांना दोन दिवस लागले. मोहम्मद कुर्बान सनाउल्ला अन्सारी(२२) असे या मृत तरुणाचे नाव होते. अन्सारी उत्तर प्रदेश राज्यातील इलाहाबाद जिल्ह्य़ातील दहीयावा गावचा रहिवासी होता. काही कामानिमित्ताने तो मुंबईत आलेला. भिवंडी परिसरात त्याचे नातेवाईक आणि बहीण राहते. मुंबईला कामानिमित्ताने आल्यावर तो त्यांच्याकडे जात असे. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना पाचारण केले. अन्सारीच्या मृतदेहाचे भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. खड्डय़ात पडून अन्सारीच्या डोक्याला मार लागल्याने तो मरण पावल्याचा अहवाल यातून समोर आला. मात्र, त्याचा भाऊ गुरफान याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला. त्याच्या आग्रहाखातर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, अपघात की हत्या याबाबतचे गूढ कायम होते.
या घटनेनंतर दोन महिन्यांचा काळ लोटला. भिवंडीतील सलामतपुरा भागातून गुरफान जात होता. या भागात त्याचे दोन नातेवाईक राहतात. अतिक जमा ऊर्फ पापा अब्दुल कयुम अन्सारी (३१) आणि सफीकुजमा अब्दुल कयुम अन्सारी (३५) अशी त्यांची नावे. या दोघांनी गुरफानला रस्त्यामध्ये अडविले. बहिणीसोबत लग्नास नकार दिल्यामुळे त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तेरा भी हाल कुर्बान जैसा करेंगे किसीको पता भी नही चलेगा, उसको कैसे हम लोगोने टपकाया वही हाल तेरा करेंगे’, अशी धमकीही त्याला दिली. या धमकीमुळे कुर्बानची हत्या झाल्याचा त्याच्या भावाचा संशय खरा ठरला. त्यामुळे त्याने शांतीनगर पोलीस ठाणे गाठले आणि भावाच्या हत्येप्रकरणी दोघांवर संशय व्यक्त केला. या संशयावरून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंपी यांनी स्वत: तक्रार नोंदवून या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. डी. शिंदे आणि पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी अतिकु आणि सफीकुजमा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली. तसेच दुसरीकडे मृत पावलेल्या कुर्बानच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. यामध्ये बरीचशी माहिती पुढे आली. कुर्बान आणि अतिक हे नातेवाईक आहेत.
अतिकला एक बहीण असून त्याने तिचे लग्न कुर्बानच्या भावासोबत करायचे ठरविले होते. या लग्नासाठी अतिक आणि सफिकुजमा हे दोघे आग्रही होते. मात्र, या लग्नास कुर्बान आणि त्याच्या भावाने नकार दिला होता. या नकारामुळे त्या दोघांना अपमानास्पद वाटू लागले आणि या सूडभावनेतून त्यांनी कुर्बानची हत्या केली. अशी महत्त्वपूर्ण माहिती चौकशीमधून पुढे येताच पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या.