ठाणे : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून कथित धर्मांतर प्रकरणी रविवारी ठाणे पोलिसांनी एकाला अलिबाग येथून ताब्यात घेतले. शाहनवाज खान असे त्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून गाजियाबाद पोलीस त्याचा शोध घेत होते. शाहनवाज हा मुंब्रा येथे वास्तव्यास होता. त्याने अनेकांचे धर्मांतर घडविल्याचा दावा गाजियाबाद पोलिसांनी केला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी शाहनवाज याला ताब्यात घेतले. त्याने गेमच्या माध्यमातून धर्मांतर केले का, याचा तपास करण्यासाठी त्याला मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील पोलीस अधिकारी शेखर बागडे यांच्या बेनामी मालमत्तेची ईडीकडे चौकशीची भाजपची मागणी
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुंब्रा येथे राहणाऱ्या शाहनवाज याने मुलांशी संपर्क साधून झाकीर नाईक याच्या भाषणाविषयी चर्चा करत होता. त्यानंतर तो मुलांचे धर्मांतर करत असे. या घटनेप्रकरणी गाजियाबाद येथील कविनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी गाजियाबाद पोलीस मुंब्रा शहरात शाहनवाजचा शोध घेत होते. शाहनवाज याने ४०० मुलांचे धर्मांतर केल्याची चर्चा समाजमाध्यमांवर प्रसारित होत होती. तर गाजियाबाद पोलिसांनीही शाहनवाजने मुंबईतील अनेकांचे धर्मांतर केल्याचा दावा केला होता. कळवा मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गाजियाबाद पोलिसांच्या कारवाई विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच मुंब्रा शहराची बदनामी होत असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी १ जुलैला मुंब्रा बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी शाहनवाज याला आता ताब्यात घेतले. त्याने मुलांचे धर्मांतर केले आहे का, याची चौकशी करण्यासाठी त्यास गाजियाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.