लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: पुणे-मुंबई डेक्कन क्वीनमधून प्रवास करणारे तीन प्रवासी शुक्रवारी धावत्या एक्सप्रेसमधून कल्याण रेल्वे स्थानकात उतरत असताना पडले. एक प्रवाशाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकारी आणि लोहमार्ग पोलिसांनी दिली.
फरीद अन्सारी असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे तर रियाज अन्सारी हे यातील एका जखमीचे नाव आहे. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. डेक्कन क्वीन एक्सप्रेसला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा नाही. पुण्याहून डेक्कन क्वीनमध्ये बसून आलेल्या तीन प्रवाशांना कल्याणमध्ये उतरायचे होते. कल्याण रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने या तरूण प्रवाशांनी डेक्कन क्वीनचा कल्याण रेल्वे स्थानकाजवळ वेग मंदावला की धावत्या गाडीतून उतरण्याचे नियोजन केले असावे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचा वेग कमी होताच, ठरल्याप्रमाणे या तीन प्रवाशांनी धावत्या एक्सप्रेस मधून कल्याण रेल्वे स्थानकात उड्या मारल्या. एक जण घरंगळत रुळाच्या दिशेने पडल्याने तो एक्सप्रेसखाली आला. दोन जण उड्या मारताना फलाटावरुन पडून गंभीर जखमी झाले. एक्सप्रेसखाली आलेला प्रवाशाला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले, तिथे दाखल करताना त्याचा मृत्यू झाला. इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. सकाळीच कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली.