शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावा जवळील श्री अंबल हॉटेल रॉयल मध्ये शुक्रवारी दुपारी दोन वृध्द कामगारांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका कामगाराने दुसऱ्यावर चाकू आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला.मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हॉटेल रखवालदाराच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. अविमन्नम अय्यादेवर (७०, रा. श्री अंबल हॉटेल रॉयल , लोढा हेवन, निळजे) असे आरोपीचे नाव आहे. सितप्पा उर्फ नटराजन (६०, रा. श्री अंबल हॉटेल रॉयल ) असे मयत कामगाराचे नाव आहे. रखवालदार सुशील महरजन याने याप्रकरणी तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, श्री अंबल हॉटेल राॅयल सकाळी सहा वाजता उघडून दुपारी दीड वाजता बंद केले जाते. संध्याकाळी सहा वाजता उघडून रात्रो १० वाजेपर्यंत सुरू असते. या हॉटेल मध्ये आरोपी अविमन्नम, मयत सितप्पा हे एकत्र राहत होते. हॉटेल बंद झाले तरी त्यांचा अनेक वर्ष मुक्काम हॉटेल मध्येच होता. रखवालदार सुशील हा महेशचंद्र पांडे यांच्या खोलीत परी प्लाझा निळजे गाव येथे राहतो.शुक्रवारी दुपारी हॉटेल बंद केल्यावर रखवालदार सुशील हा निळजे येथील घरी गेला. या कालावधीत अविमन्नम आणि सितप्पा हे हॉटेल मधील मजबूत दारू प्यायले. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली.
दोघेही दारुने तर्र असल्याने त्यांच्या बाचाबीचे रुपांतर भांडण आणि तुंबळ हाणामारीत झाले. हे भांडण सोडविण्यासाठी हॉटेलमध्ये कोणी नसल्याने दोघांनी एकमेकांना लाकडी दांडके, चाकूने हल्ला करुन एकमेकांना जखमी केले.अविमन्नम याने सितप्पावर चाकूने हल्ला केला. सितप्पाने लाकडी दांडक्याने अविमन्नमवर प्रहार केले. दोघेही हाणामारीत गंभीर जखमी, रक्तबंबाळ होऊन हॉटेलमध्ये बेशुध्द होऊन पडले होते. शुक्रवारी संध्याकाळी रखवालदार सुशील हॉटेल उघडून आत आला. तेव्हा त्याला हॉटेलमध्ये रक्त पडल्याचे एका खोलीत अविमन्नम, दुसऱ्या खोलीत सितप्पा निपचित पडल्याचे दिसले. हा प्रकार पाहून सुशील घाबरला.
त्याने सितप्पा, अविमन्नमला हलविले. ते प्रतिसाद देत नव्हते. दोघांच्या तोंडावर पाणी मारले. तरीही ते शुध्दीवर येत नव्हते. हॉटेलवर दरोडा पडला की काय असे सुशीलला वाटले.थोड्या वेळाने अविमन्नम शुध्दीवर आला. त्याने घडला प्रकार सुशीलला सांगितला. अविमन्नम याने लाकडी दांडक्याने सितप्पा याच्या सर्वांगावर प्रहार करुन त्याला गंभीर जखमी करुन त्याला ठार मारले असल्याचे लक्षात आल्यावर रखवालदार सुशील याने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी अविमन्नम विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.