ठाणे : आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने ३५ वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून ४० हजार रुपये कर्ज घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत.
वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात तरुण राहतो. तो एका कंपनीत साफसफाईचे काम करतो. सुमारे दीड महिन्यांपूर्वी त्याला एका व्यक्तीने संपर्क साधला. आपण बँकेतून बोलत असून आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक करून देण्यासाठी हा संपर्क केल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. तरुणाचे खाते लिंक नसल्याने त्याने त्या व्यक्तीची वागळे इस्टेट येथील बसगाडीच्या थांब्यावर भेट घेतली. त्याठिकाणी त्या व्यक्तीने तरुणाकडून त्याचा मोबाईल घेतला आणि बँकेचे ॲप सुरू केले. त्यामध्ये त्याने काहीतरी तांत्रिक प्रक्रिया केली. त्यानंतर त्या व्यक्तीने बँक खाते लिंक झाल्याचे सांगितले आणि तो तिथून निघून गेला.
हेही वाचा – कल्याणमध्ये डाॅ. आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तकांचे मुलांकडून सामुदायिक वाचन
हेही वाचा – टिटवाळ्यात दुकान मालकाची हत्या करणाऱ्या नोकराला साथीदारांसह अटक
काही दिवसांपूर्वी तरुणाला मोबाईलवर एक संदेश प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांनी ४० हजार रुपये कर्ज घेतल्याचा उल्लेख होता. या प्रकारानंतर तरुणाने बँकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, बँकेने त्यांच्या खात्यामधून कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. आपल्या बँक खात्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीने कर्ज मंजूर करून ते दुसऱ्या खात्यात वळते केल्याचे समजल्यानंतर याप्रकरणी तरुणाने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.