ठाणे : अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भिवंडी शहरात सोमवारी मच्छी, मास विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु समितीच्या बैठकीत असा निर्णय झालेला नाही अशी चर्चा आता सुरु झाली आहे. काही ठराविक संघटनांच्या मागणीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचे आता सांगितले जात आहे. शांतता समितीच्या बैठकीत असा निर्णय झाला नसेल तर मग नेमका कशाच्या आधारे हा निर्णय घेतला गेला अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.
अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला दोन्ही समाजाच्या संघटना, पोलीस, शांतता समिती सदस्य, पालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. १८ जानेवारी रोजी पोलीस संकुलात ही बैठक पार पडली. यामध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दोन्ही समाजाला पोलिसांनी महत्वाच्या सूचना दिल्या. दरम्यान, या बैठकीनंतर पालिका प्रशासनाने एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. त्यात बैठकीमध्ये सोमवारी मटण, चिकन आणि मच्छी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे ठरल्याचे पालिकेने म्हटले आहे. पालिकेने असा दावा केला असला तरी समितीच्या बैठकीत असा निर्णय झालेला नसून काही संघटनाच्या मागणीवरून पालिकेने हा निर्णय घेतल्याचे पालिका आणि पोलीस सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – ठाणे : गोड तुझे नाम… जय श्रीराम नाम असणाऱ्या पेढ्यांना नागरिकांची अधिकची पसंती
हेही वाचा – मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ?
भिवंडीत या निर्णयावर चर्चा का सुरु आहे ?
भिवंडीत मुस्लिम समुदायाची संख्या बरीच मोठी आहे. यााठिकाणी मासाहार विक्रिची दुकाने तसेच खाटीकखानेही मोठ्या संख्येने आहे. ही सर्व ठिकाणे सोमवारी बंद राहाणार आहेत. भिवंडीतील कायदा-सुव्यवस्था राखली जावी यासाठी बरेचसे निर्णय पोलीस प्रशासन हे शांतता समितीच्या बैठकीच्या माध्यमातून घेत असते. मात्र महापालिकेने घेतलेला हा निर्णय समितीच्या बैठकीत झालेला नाही, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून दिली जात आहे.