ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. तर, बुधवारपासून आवकही वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी घाऊक बाजारात कांद्याच्या दरात प्रति किलो आठ ते दहा रुपयांची घसरण झाली. दरम्यान, घाऊक बाजारात दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याची विक्री ७५ ते ९० रुपये प्रति किलो या दराने होत आहे. वाशी येथील घाऊक बाजारात मंगळवापर्यंत कांद्याचे दर ५५ ते ५८ रुपयांपर्यंत होते. यामध्ये बुधवारपासून घट होऊ लागली. मुंबई महानगर क्षेत्रातील पंचतारांकित आस्थापनांमध्ये उत्तम दर्जाचा कांदा खरेदी केला जातो. या कांद्याचे घाऊक दर शनिवापर्यंत ५८ ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले होते.
त्या तुलनेने कमी दर्जाचा कांदा ४८ ते ५२ रुपये प्रति किलोने विकला जात होता. या वाढीव दरामुळे बाजारातील मागणी ही काही प्रमाणात घटली होती. त्यातच, मंगळवारपासून नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून मुंबईतील बाजारपेठेत होणारी कांद्याची आवकही १५ ते २० गाडय़ांनी वाढली. त्याचा परिणाम घाऊक बाजारातील दरांवर दिसू लागला असून गुरुवारी कांद्याच्या दरात प्रति किलो मागे आठ ते दहा रुपयांनी घट झाली अशी माहिती ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र शेळके यांनी दिली.राज्यातील वेगवेगळय़ा भागात झालेल्या मराठा आंदोलनामुळे काही बाजार बंद होते. त्यामुळेही कांद्याच्या मागणीवर परिणाम झाल्याचे दिसले. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून कांदा आवक वाढली आणि दर काही प्रमाणात कमी झाल्याचे शेळके यांनी सांगितले.