नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कांदा लिलाव बंद ठेवला आहे. परिणामी, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने कांदा महागला आहे. घाऊक बाजारात २ रुपयाने तर, किरकोळ बाजारात पाच रुपयाने कांद्याचे दर वाढले आहेत. नाशिक, लासलगाव, पुणे आणि नगर जिल्ह्यातून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक होत असते. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७० टक्के कांदा हा नाशिक आणि लासलगाव येथून विक्रीसाठी दाखल होत असतो.
हेही वाचा >>> देहविक्री महिला पुनर्वसन प्रकल्पाच्या आशा धुसर; महिलांचे मतपरिवर्तन करणाऱ्या सामाजिक संस्थांपुढे पेच
गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यासाठी कांदा लिलाव बंद केला आहे. यामुळे राज्यातील विविध भागात कांद्याची आवक घटल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक ३० ते ५० टक्क्यांनी घटली आहे. गेल्या आठवड्यात बाजार समितीत १४ हजार ८५९ क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. तर, या आठवड्यात १० हजार १७३ क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. कांद्याची आवक घटल्याने त्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. घाऊक बाजारात २ रुपयाने तर, किरकोळ बाजारात ५ रुपयाने कांदा महागला आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात २३ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारा कांदा सध्या २५ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येत आहे. तर, किरकोळ बाजारात ३० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारा कांदा सध्या ३५ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती कांदा विक्रेत्यांकडून देण्यात आली.