लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : जादा परतावा मिळवून देतो असे सांगून ७० वर्षीय महिलेची ऑनलाईनद्वारे ५७ लाख ८५ हजार २३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शेअर बाजाराच्या नावाखाली ही फसवणूक झाली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक झालेली वृद्ध महीला कॅसलमील भागात पतीसोबत राहते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक संदेश प्राप्त झाला. या संदेशामध्ये ऑनलाईनद्वारे ट्रेडिंग केल्यास गुंतवणूकीवर जादा परतावा मिळेल असे सांगण्यात आले. तसेच त्यांना एक ॲप देखील मोबाईलमध्ये सामाविष्ट करण्यास सांगितले. त्यानुसार, वृद्धेने ॲप डाऊनलोड केले. त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर त्या ॲपमध्ये परतावा मिळत असल्याचे दिसले. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने त्यांनी ५७ लाख ८५ हजार २३ रुपयांची गुंतवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली.