निश्चलनीकरणानंतर नवख्या डेबिट कार्डधारकांच्या फसवणुकीमध्ये वाढ
निश्चलनीकरणानंतर उद्भवलेल्या रोकड टंचाईवर पर्याय म्हणून कॅशलेस व्यवहाराचा मार्ग पत्करणाऱ्या नागरिकांच्या नवखेपणाचा फायदा घेत त्यांना लुबाडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. गेल्या महिन्याभरात अशा प्रकारे विविध प्रकरणात कोटय़वधी रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
गेल्या ५० दिवसांत डेबिट कार्ड आणि एटीएम कार्डला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. नोटाबंदीच्या काळात बॅंकेतील रांगांपासून वाचण्यासाठी अनेकांनी एटीएम आणि डेबिट कार्डची मदत घेतली. पैसे मिळवण्यासाठी अनेकांनी विविध ठिकाणी जाऊन डेबिट कार्ड स्वाईप केले होते. डेबिट कार्डमुळे पेट्रोल पंप, मॉल, सुपरमार्केट हॉटेल, किराणा दुकाने आणि इतर अनेक खरेदी केंद्रावरही डेबिट कार्डच्या मदतीने व्यवहार झाले. त्यामुळे कधी नव्हे ते डेबिट कार्डधारकांची संख्या वाढली. खाते सुरू करतेवेळी मिळालेले डेबिट कार्ड अनेकांनी पुन्हा कपाटातून वापरासाठी बाहेर काढले. मात्र अनेकांनी त्याचा वापर केला नसल्याने त्याच्या वापराबाबत अनेक संभ्रम होते. तसेच दररोज बदलणाऱ्या रिझव्र्ह बॅँकेच्या नियम आणि अटींमुळे रोकडरहित व्यवहाराबाबत गोंधळ वाढत होता. याच दरम्यान जुन्या नोटा भरणे आणि नव्या मिळवणे या कामांव्यतिरिक्त अनेक कामे बंद पडली होती. त्यामुळे डेबिट कार्डच्या संबंधित कामे करायची कुठे असाही प्रश्न अनेक कार्डधारकांसमोर होता. त्याच काळात काही बोगस आणि फसव्या दूरध्वनीवरून आलेल्या फोनमुळे अनेकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाली. काही अनोळखी फोनवरून कार्ड धारकाला मी तुमच्या बँकेतून बोलत आहे. नोटाबंदीनंतर अनेक कार्डचे पासवर्ड बदलले असून तुमचे कार्ड सुरू करायचे असल्यास तुम्हाला तुमचा कार्ड क्रमांक आणि पिन क्रमांक सांगावा लागेल, अशी बतावणी करण्याचे अनेकांना फोन आले. त्यामुळे घाबरून जाऊन अनेकांनी आपले एटीएम आणि डेबिट कार्डचे क्रमांक आणि त्यासोबतचे पासवर्ड किंवा पिन क्रमांक सांगितले. त्यामुळे अनोळखी चोरटय़ांनी त्यावरून ऑनलाइन शॉपिंग करून अनेकांना कोटय़वधींचा गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. गेल्या आठवडय़ात एकाच दिवसात कल्याणमध्ये तिघांची फसवणूक झाली होती. अजूनही असे प्रकार सुरू असल्याचे विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ांवरून समोर आले आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी जागरूकता अभियान राबवण्याचे, गरज आहे. तसेच चलनातील ५०० आणि एक हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर ऑनलाइन किंवा डेबिट कार्डचा नंबर मिळवत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रोकडरहित व्यवहाराबाबत मोठय़ा प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रबोधनाच्या प्रयत्नानंतरही फसवणूक
विविध बँका अशा प्रकारे आपली फसवणूक होउ शकते, असे संदेश विविध माध्यमांतून पाठवत आहेत. केंद्र सरकार आणि रिझव्र्ह बॅँकेकडूनही अशा प्रकारे प्रबोधन केले जाते आहे. मात्र तरी असे गुन्हे वाढत असल्याचे समोर आले आहे. आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हे अशा दोन्ही प्रकारात हे गुन्हे येतात. त्यामुळे या गुन्ह्य़ांची उकल होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे समोर आले आहे.