दिवा येथील कचराभूमी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून डायघर येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु असून विविध कारणांंमुळे विलंब होत असलेल्या या प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी पालिकेने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रकल्पात कचरा विल्हेवाटीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री जर्मनी आणि ऑस्ट्रोलियातून घेण्यात येणार असून त्यासाठी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी, ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांची आज, मंगळवारी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत यंत्रसामुग्रीद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून वीज निर्मीती कशी केली जाते, याचीही आढावा घेतला जाणार आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दुजोरा दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ९५० मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते. परंतु महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे दिवा येथे कचरा टाकण्यात येत होता. या कचराभुमीला आग लागून परिसरात धुर पसरतो. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. यामुळे दिवेकरांकडून ही कचराभुमी बंद करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने डायघर भागात कचऱ्यावर प्रक्रिया करून १३ मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. १२०० मेट्रीक टन कचरा विल्हेवाट क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ठेकेदाराची नेमणूक करून प्रकल्पाचे भूमिपूजन काही वर्षांपुर्वी उरकले होते. परंतु विविध कारणांंमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु होऊ शकला नव्हता. प्रकल्पास विलंब झाल्याने प्रस्तावित तंत्रज्ञान कालबाह्य़ झाल्याचा दावा करत हा ठेका रद्द करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाकरिता नव्याने प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
अखेर जुन्याच ठेकेदारामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हा प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, संरक्षक भिंत, परिसरात झाडांची लागवड अशी कामे पालिकेने पुर्ण केली आहेत. त्याठिकाणी आता कचरा विल्हेवाटीसाठी यंत्रसामुग्री बसविण्याचे काम शिल्लक असून त्यासाठी पालिकेने आता यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी संबंधित कंपन्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रोलिया या देशातील कंपन्यांकडे कचरा विल्हेवाटीकरिता अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असून त्या कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास संबंधित कंपनीचे प्रतिनिधी, ठेकेदार आणि महापालिका अधिकरी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत यंत्रसामुग्रीद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून वीज निर्मीती कशी केली जाते, याचीही आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.