१२ आकडी क्रमांकामुळे शिधापत्रिकाधारकाची माहिती एका क्लिकवर
वसई-विरार शहरातील साडेतीन लाख शिधापत्रिकांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून या सर्व शिधापत्रिका ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिधापत्रिकेवर १२ आकडी क्रमांक टाकण्यात आला असून हाच क्रमांक आता नागरिकांची नवी ओळख राहणार आहे. हा क्रमांक, तसेच आधारकार्डाच्या क्रमांकाने राज्यभरातून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाची नोंद एका क्लिकववर मिळणार आहे.
राज्यातील सर्व शिधापत्रिका संगणकीकृत करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते. त्यानुसार वसईच्या पुरवठा शाखेने हे काम सुरू केले होते. सर्व शिधापत्रिकांधारकांची माहिती मिळवून त्यांच्या संगणकात अभिलेख बनवण्यात येत होता. हे काम आता पूर्ण झाले असून ३ लाख ५२ हजार शिधापत्रिकांची संगणकात नोंद करण्यात आली आहे. त्या आधारकार्डाशी संलग्न करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक शिधापत्रिकेवर १२ आकडी क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकाने प्रत्येक नागरिकांची माहिती एका क्लिकवर मिळेल, असे पुरवठा विभागाचे प्रमुख नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी सांगितले. दररोज १००हून अधिक नव्या शिधापत्रिका बनवण्याचे काम सुरूच असून त्यासाठी खास कक्ष उभारण्यात आला आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. सध्या वसई-विरार शहरात साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील एक लाख १३ हजार शिधापत्रिकाधारक प्राधान्य कार्ड वर्गवारीत (केसरी शिधापत्रिका) आहेत. वसई-विरार शहरात धान्य आणि केरोसिन वाटप करण्यासाठी १७९ शिधाकेंद्रे आहेत.
शिधापत्रिकाधारकांना स्मार्टकार्ड
शिधापत्रिकांची संगणकात नोंद झाल्यानंतर आता शिधापत्रिकाधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून नागरिकांना स्मार्टकार्ड शिधापत्रिका वाटप केल्या जाणार आहेत. या स्मार्ट शिधापत्रिका एटीएम कार्डाच्या आकाराच्या असतील आणि पाकिटात मावू शकतील. त्या टिकाऊ असल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. अनेकदा शिधापत्रिका फाटतात, त्याची पाने गहाळ होतात आणि मग अनेक समस्या निर्माण होतात. त्या त्रासापासून मुक्तता होणार आहे. स्मार्टकार्डची नोंद ऑनलाइन राहणार आहे. त्यामुळे गरजू कुटुंबाला धान्य मिळाले की नाही त्याची नोंद पुरवठा खात्याकडे राहणार आहे.