ठाणे : वाचनाची आवड असूनही रोजच्या कामाच्या धबडग्यात वाचनासाठी वेळ पुरत नाही, हा काहीसा निराशेचा सूर अनेकांच्या कानावरून गेला असेल. पण, करोना काळात सर्वत्र निराशजनक वातावरण असताना ठाण्यातील काही जणांना आशेचे स्वर ऐकू येऊ लागले. हे काही जण १५ ते २० जणच होते. या साऱ्यांनी मिळून ‘रसिक वाचक समूह’ तयार केला. ‘झूम’ बैठकांद्वारे स्वत:ला आवडलेल्या पुस्तकाची वैशिष्ट्ये आणि त्यातील विशेष परिच्छेदांचे प्रेक्षकांसमोर वाचन होऊन मग प्रश्नोत्तरे होऊन या उपक्रमाची सांगता होऊ लागली. करोना काळात सुरू झालेल्या या उपक्रमाला आजही उत्तम प्रतिसाद मिळत आहे, ही मोठी आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ‘रसिक वाचक समूह’ सदस्यांनी व्यक्त केली. या घडीला या समूहाच्या रसिक संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ‘झूम’च्या माध्यमातून महिन्यातून दोनदा हा उपक्रम होतो. इतर प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम युट्यूब वाहिनीवर उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती ‘रसिक वाचक समूहा’चे संस्थापक भूषण मुळ्ये यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात प्रत्येकावरच मानसिक ताण होता. एक प्रकारची भीती होती. अशा वेळी ऑनलाइन वाचनानंदात वाढ झाली. या समूहात कोणी योग साधना करणारा होता. कोणी संगीताचे शिक्षण घेत होता. कोणी मैफलींना जाणारा होता. कोणी पुस्तक वाचनाचे कार्यक्रम घेत होते. सदाशिवराव कुलकर्णी यांना ऑनलाइन वाचन संकल्पना भावून गेली. त्यांनी भूषणच्या साथीने वाचन संस्कृती आणि मराठी भाषा संवर्धनाचा ध्यास घेतला. २०२१ मध्ये ऑनलाइन वाचन उपक्रमाला सुरुवात झाली.

करोना काळात प्रत्येक शनिवारी हे सत्र होत असायचे. एका, दोन किंवा अधिक पुस्तकांचे रसग्रहण याठिकाणी केले जाते. करोनानंतर पुन्हा सर्व सुरळित झाले असल्यामुळे आता हा कार्यक्रम महिन्यातून दोन दिवस होत आहे. आता, उपक्रमात सदस्य संख्या वाढली असून नवी पुस्तके व्यक्तिचित्रणांचे वाचन केले जाते. या समुहातील सत्रांमध्ये ३० च्या पुढील वयोगटातील तर, काही सत्रांमध्ये १५ ते २० वयोगटातील तरुणमंडळी सहभागी होतात. ठाणेच नव्हे तर, इतर शहरातील तसेच जिल्ह्यातील वाचक या समुहाशी जोडला गेला आहे. काही कवी आणि लेखकांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

आजवरची वाचलेली पुस्तके

निसर्ग गप्पा, मी अश्वत्थामा बोलतोय,ययाती, इकिगाई, फेलूदा, आठवणींचा पायरव, लॉस्ट बॅलन्स (मराठी), ऋतुचक्र, विघ्नविराम, विश्वाचे आर्त, अस्वस्थसूत्र, घातसूत्र, रारंग ढांग, डोंगरवाटा, बा.भ. बोरकरांच्या कविता आणि अशा बऱ्याच पुस्तकांचे या समुहावर वाचन झाले आहे.