नोकरी निमित्त भागीदारी पध्दतीने एक सदनिका भाड्याने घेऊन डोंबिवलीत दोन मैत्रिणी एकत्र राहत होत्या. एका मैत्रिणीने दुसऱीला काही कळू न देता रात्री तीन वाजता मैत्रिणीच्या मोबाईल फोन उपयोजनाचा वापर करुन २८ हजार रुपये बँकेतून परस्पर वळते केले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कु. प्रियंका रामदास पडोळ (२७, रा. परिक्रमा सोसायटी, संगितावाडी, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार तरुणीचे नाव आहे. तिची सदनिका भागीदारीण मैत्रिण कु. जईता ब्रोजेन आचार्य हिच्या विरुध्द प्रियंका हिने तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले, प्रियंका, जईता या दोघी मैत्रिणी नोकरीच्या निमित्ताने संगितावाडी येथे एक सदनिका भाड्याने घेऊन तेथे भागीदारी पध्दतीने राहतात. तक्रारदार प्रियंका पडोळ, आरोपी जईता या कामावरुन परतल्यानंतर रात्री दोघींचे भोजन झाल्यानंतर त्या झोपी गेल्या.

जईताने पहाटे तीन वाजता गुपचूप उठून प्रियंकाचा मोबाईल ताब्यात घेतला. प्रियंकाच्या मोबाईल मधील फोन पे उपयोजनचा वापर करुन त्यामध्ये प्रियंकाचा गुप्त संकेतांक आणि ओळखपत्र क्रमांक वापरुन प्रियंकाच्या आयसीआयसीआय बँक खात्यामधून २८ हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने धिरेन्द्र कुमार लालबहादुर राय यांच्या बँक खात्यावर वळते केले. ते पैसे जईताने धिरेंद्रच्या माध्यमातून स्वताच्या बँक खात्यावर वळते करुन घेतले.

हेही वाचा : गणेशोत्सव देखाव्यातून ‘ टाटा कर्करोग रुग्णालयाला’ मानवंदना ; डोंबिवलीतील मंडळाने देखाव्यात उभारले हुबेहूब रुग्णालय

सकाळी उठल्यानंतर प्रियंकाला मोबाईलवर आपल्या बँक खात्यामधून पैसे वळते केल्याचे लघुसंदेश बँकेकडून आले होते. आपण रात्रीतून कोणताही व्यवहार केला नसताना अचानक आपल्या बँक खात्या मधून पैसे कोणी वळते केले म्हणून अस्वस्थ झालेल्या प्रियंकाने बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी तिला आपल्या खोलीत राहणाऱ्या मैत्रिणीनेच हा सगळा गैरप्रकार केला असल्याचे निदर्शनास आले. आपल्या सोबत राहुन आपली फसवणूक आणि चोरी केल्याबद्दल प्रियंकाने जईता विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Story img Loader