ठाणे : शिवसेनेचे वारसदार म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानले होते. परंतु त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एका व्यक्तीला जरी एक लाख रुपये आरोग्य सेवा म्हणून दिले असतील तर पुन्हा मी उद्धव सेनेत जायला तयार असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील म्हणाले.
माणसे तडफडून मरत होते. आम्ही आमदार म्हणून साहेबांचे नाव टाकून पत्र देत होतो, पण एक रुपया मिळाला नाही अशी टिकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर माझ्या तालुक्यात दोन कोटी रुपयांहून अधिकचा निधी आणला. असा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात लहान मुलांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहाजी पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते.
हेही वाचा – महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती
पैंगबर, येशूख्रिस्त, राम, कृष्णाने, वामन, परशूरामाने अवतार घेतला. आता भगवान या पृथ्वीवर यायला तयार नाही. त्यामुळे परमेश्वराने दयेचा अंश असलेला एक माणूस या पृथ्वीवर पाठवून देण्यास सुरूवात केली. जेणेकरून गोर-गरिबांची सेवा होईल. त्यामुळे भगवंताचे अंश असलेले आणि दयेचा रूप असलेले खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्त्याने सेवा सुरू ठेवली आहे असे विधान शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी केले.