‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर कोळसा वाहतूक गाडय़ांवर ताडपत्रीचे आवारण
मध्य रेल्वेच्या मार्गावरून कोळसे वाहतूक करणाऱ्या खुल्या मालगाडय़ांवर प्लास्टिक ताडपत्र्यांचे आवरण आच्छादण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. यापूर्वी अशा प्रकारची खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र प्लास्टिकमुळे ओव्हरहेड वायरला धोका असल्याचे सांगत प्लास्टिक टाकणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत होते. रेल्वेकडून प्रवाशांवर होणारी ही ‘धूळफेक’विषयीचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रवासी संघटनांनी रेल्वेच्या या धूळफेकीविरोधात आवाज उठवून संताप व्यक्त केला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने जाड ताडपत्रीचे संपूर्ण डबा झाकेल, असे आवारण मालगाडय़ांवर टाकण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे पलीकडच्या स्थानकांमध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे प्रत्येक रेल्वे स्थानकातील फलाट गर्दीच्या काळात खचाखच भरलेले असतात. अशावेळी कोळशांनी भरलेली एखादी मालगाडी रेल्वे रुळावरून धडधडत निघून जाते आणि त्याचातून उडणाऱ्या काळ्या धुळीत प्रवासी माखून जातात. एकाच वेळी नाका-तोंडात आणि डोळ्यांत जाणाऱ्या या काजळीमुळे प्रवाशांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी या काजळीमुळे फुफ्फुस निकामे होण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी प्रवासी संघटनांचा रोष आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांची निरीक्षणे नोंदवली होती. याविषयीचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर रेल्वेच्या कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडय़ांनी ताडपत्री आवरण घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फलाटांवर उडणाऱ्या धुळीचे प्रमाण दोन दिवसांपासून घटण्यास सुरुवात झाली आहे. तरही दिवसातून एखाद-दुसरी आवरण नसणारी गाडी येत असल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open coal train bogie covered by tarpaulin after loksatta news
Show comments