ठाणे जिल्ह्य़ातील बेपत्ता तसेच अपहरण झालेल्या मुला-मुलींचे शोध घेण्यासाठी ठाणे शहर व ग्रामीण पोलिसांनी गेली महिनाभर राबविलेल्या ‘ऑपरेशन स्माइल-२’ मोहिमेत आतापर्यंत २१६ मुला-मुलींची त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून दिली आहे. २१६ पैकी १६२ मुला-मुलींचा ठाणे शहर पोलिसांनी तर उर्वरित ५४ मुला-मुलींचा शोध ठाणे ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. विशेष म्हणजे, यापैकी बेपत्ता तसेच अपहरण झालेली काही मुले-मुली उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक या परराज्यात सापडली आहेत. याशिवाय, काही भीक मागणाऱ्या मुलांचा समावेश असून त्यांनी भीक मागू नये म्हणून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने देशभरात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्याचे निर्देश दिले होते. बेपत्ता तसेच अपहरण झालेल्या मुला-मुलींचे शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले होते. यामध्ये अनेक मुला-मुलींचे शोध लावण्यात पोलिसांना यश आले होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे ऑपरेशन पुन्हा राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, जानेवारी महिन्यात ठाणे शहर व ग्रामीण पोलिसांनी १८ वर्षांखालील बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन स्माइल-२’ ही मोहीम राबविली. या मोहिमेसाठी ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ३४ विशेष पथके तयार केली होती. तसेच चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फतही मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेंतर्गत पथकांनी ३३ मुले व ३५ मुली अशा एकूण ६७ जणांचा शोध लावून तब्बल ६१ अपहरणाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच ३४ बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या नऊ मुले सापडली असून ती त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बालगृहातील ३५ मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात आला आहे. १३ भीक मागणाऱ्या मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. याशिवाय, परराज्यातून सात मुलांचा शोध घेण्यातही ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. यापैकी तीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल होते.
ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या पाच वर्षांत १०३१ मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी १०१५ सापडल्या आहेत. उर्वरित १६ बेपत्ता होत्या. बेपत्ता असलेल्या ६६१ मुलांपैकी ६३५ मुले सापडली, पण २६ मुले सापडलेली नव्हती. त्याचप्रमाणे २०१ मुलीच्या अपहणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी १७५ मुली सापडल्या. उर्वरित २६ मुली सापडल्या नव्हत्या. ११ मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी ९८ मुले सापडली होती. उर्वरित १३ मुलांचा शोध लागला नव्हता. असे एकूण गेल्या पाच वर्षांत ७८ मुले सापडलेली नव्हती. त्यात ३९ मुले व ३९ मुलींचा समावेश होता. दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात ‘ऑपरेशन स्माइल-२’ ही मोहीम राबवून ५४ मुलांचा शोध लावला. याशिवाय, आणखी दहा मुले उत्तर प्रदेश, नेपाळ, परभणी, पुणे आदी ठिकाणी असल्याची पथकाला माहिती मिळाली आहे. यामुळे या मुलांचा पथकाकडून शोध सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा