लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ : ज्या लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते, तशीच योजना आणून जास्त पैसे देण्याचे जाहीर करतात. आमचीच योजना कॉपी करतात. फक्त योजनाच नाही तर वचननामाही विरोधकांनी चोरला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अंबरनाथचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारासाठी आयोजीत सभेत शिंदे बोलत होते. महाराष्ट्राचे दुर्दैव हे की विरोधक विकासाचे सोडून योजना आणि प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन देतात, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
राज्याच्या विकासासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. मात्र काहींचे आडीच वर्षे केंद्र सरकारशी भांडण्यात गेले, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आम्ही केंद्रासोबत बोलत राज्यासाठी निधी, योजना आणल्या. आज काही लोक प्रचारात निवडून आल्यानंतर ही योजना बंद करू, तो प्रकल्प बंद करू असे जाहीर करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली. अंबरनाथ शहर आज ठाणे शहराशी स्पर्धा करते आहे. शहरात अनेक प्रकल्प पूर्ण झाले. अंबरनाथ, बदलापूर शहराचे रस्ते चांगले झाले आहेत, असेही यावेळी शिंदे म्हणाले.
आज विरोधकांकडे बोलायला नाही. त्यामुळे त्यांनी आधी लाडकी बहीण योजनेवर टिका केली. आज तशीच योजना आणू असे सांगतात. योजना चोरली, आमचा जाहिरनामाही चोरला, असे सांगत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर टीका केली. अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर यांना मत म्हणजे एकनाथ शिंदेंना मत, असेही शिंदे म्हणाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार किसन कथोरे आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाइंचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी वाचा-मलंगगड परिसरात सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक फाडले
किसन कथोरेंना विजयी करा
अंबरनाथ शेजारच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे भाजपकडून महायुतीच उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मात्र स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. मात्र अंबरनाथच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरबाडमधून किसन कथोरे यांना विजयी करा, असे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधातल्या शिवसैनिकांना चपराक बसल्याची चर्चा आहे.