ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आदी शहरे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडली आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे या शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिला नाही. यामुळे वाहतूक पोलिसांनी ‘वर्तुळाकार’ पद्धतीने वाहतूक मार्गात बदल करण्याचे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेले वाहतूक बदलाचे प्रयोग कायम स्वरूपी लागू केले आहेत. या वाहतूक बदलांमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचे जंक्शन बनलेल्या चौकाचौकांमध्ये अशा स्वरूपाचा वाहतूक बदल राबविता येऊ शकतो का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांमार्फत सुरू आहे.
ठाणे वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी पहिल्यांदा शहरातील वाहतूक मार्गात ‘वर्तुळाकार’ पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर बदल राबविण्यास सुरुवात केली. देशमाने यांनी ठाणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या गोखले मार्गावरील मल्हार चौक, हरिनिवास सर्कल आणि तीन हातनाका चौकामध्ये ‘वर्तुळाकार’ पद्धतीने वाहतूक बदलांचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविला. या बदलास व्यापाऱ्यांचा विरोध होत असतानाही विक्रम देशमाने ठाम होते. मात्र, त्यांची बदली होताच वाहतूक शाखेने हा प्रयोग गुंडाळला. असे असले तरी, वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी तीन पेट्रोलपंप परिसरात ‘वर्तुळाकार’ पद्धतीने वाहतूक बदलांचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविला आणि त्यानंतर हा वाहतूक बदल कायमस्वरूपी करण्यात आला. त्यापाठोपाठ विद्यमान पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक मार्गामध्ये काही बदल केले असून यामुळे या भागातील वाहतूक कोंडी थोडी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या बदलांविषयी सुरुवातीला नकारात्मक भूमिका घेणाऱ्या नागरिकांनाही आता त्याचे महत्त्व पटू लागले असून ‘वर्तुळाकार’ पद्धतीने करण्यात येणाऱ्या वाहतूक बदलांना नागरिकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. डॉ. करंदीकर यांनी गीता सोसायटी भागात राबविलेल्या वाहतूक बदलांमधून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून गीता सोसायटी परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडल्याने येथील रहिवाशी हैराण झाले होते. मात्र, या बदलामुळे या भागातील वाहतूक कोंडी काहीशी कमी झाल्यामुळे रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
लोकसंख्येसोबत वाहनेही वाढली
ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आदी शहरांमध्ये मोठ-मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. परिणामी शहरांची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच शहरातील लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. तसेच नवीन वाहन खरेदीमुळेही वाहनांच्या संख्येत अधिक भर पडत आहे. मात्र, या तुलनेत ठाणे शहरातील रस्ते अपुरे पडू लागले असून त्यापैकी काही रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. त्याचबरोबर शहरांमध्ये वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भरच पडते.
वाहतूक मार्गातील बदलांचा विचार..
ठाणे शहराला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी काही मार्गावर वाहतूक बदलांचे प्रयोग राबविण्यात आले असून या बदलांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळत आहे. अनेक रस्ते अरुंद असल्याने त्यांच्या रुंदीकरणास वाव राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बदलास सहकार्य करायला हवे. तसेच शहरांमध्ये वाहतूक कोंडीचे जंक्शन बनलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून तेथील वाहतूक मार्गात अशा स्वरूपाचा बदल करता येतो का, याची चाचपणी करण्यात येत आहे. भिवंडी, डोंबिवली तसेच कल्याण शहरांमध्येही अशा स्वरूपाचा वाहतूक बदल करण्याचा विचार आहे. मात्र, डोंबिवली तसेच कल्याण शहरांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे या भागात सध्या तरी बदल करणे शक्य नाही, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.
नीलेश पानमंद