कल्याण : ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान खाडी किनारी भागात असलेल्या रेल्वे रुळांपासून ६०० मीटर परिसरात (दोन हजार फूट) २४ तास १४ मार्चपर्यंत अवैध वाळू उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त मीना मकवाणा यांनी काढला आहे. या आदेशामुळे १४ मार्चपर्यंत कोणालाही ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांजवळ दोन हजार फूट परिसरात अवैध वाळी उत्खनन करता येणार नाही. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या २००३ कलम २२३ (१) (अ, ब) कलमान्वये कारवाई केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील २० वर्षाच्या कालावधीत वाळू तस्करांनी ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील मुंब्रा, कोपर रेल्वे रुळांजवळील खारफुटी तोडून तेथे वाळू उत्खनन केले आहे. कोपर येथे रेल्वे मार्गाच्या भक्कम आधार धसाला धक्का पोहचेल अशा पध्दतीने वाळू माफियांनी खोदून ठेवले आहे. याठिकाणी रेल्वे प्रशासनाला रेल्वे रुळाच्या संरक्षणासाठी सिमेंट काँक्रीटची आधार भिंत बांधावी लागली आहे. मुंब्रा ते कोपर खाडी किनारा भागातील खारफुटीची हजारो झाडे वाळू तस्करांनी वाळू उत्खननासाठी नष्ट केली आहेत. या भागातील जैवविविधता संपुष्टात आली आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

वाळू माफिया गुन्हेगार पार्श्वभूमीचे असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक थेट त्यांना उघडपणे आव्हान देऊ शकत नाही. महसूल विभागाने या वाळू माफियांविरुध्द कारवाया करून त्यांच्या वाळू उपशाच्या बोटी नष्ट केल्या आहेत. तरीही दिवस, रात्र ते चोरून लपून वाळू उपसा करत आहेत. आता वाळू उपशासाठी ते रेल्वे रूळ भागाला पसंती देत आहेत. नागरिकांच्या जीविताला धोका या वाळू माफियांनी निर्माण केला आहे. कांदळवनाचा हरितपट्टा वाळू माफियांनी नष्ट केला आहे. या गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून, अवैध वाळू उपशास मज्जाव करण्यात यावा, या मागणीसाठी पर्यावरणप्रेमी नागरिक गणेश पाटील यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे.

या अवैध वाळू उत्खननामुळे रेल्वे मार्गास उत्पन्न होणाऱ्या धोक्याबाबत, कांदळवनाचे संरक्षण विषयावर यापूर्वी महाराष्ट्र सागरी मंडळ, रेल्वे, पोलीस यंत्रणेची एकत्रित बैठक झाली होती. त्यावेळी वाळू उत्खननामुळे रेल्वे रुळाजवळ जेथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे गॅबियन धर्तीचे बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत, असे सांगण्यात आले होते. न्यायालयातील याचिकेचा विचार करून रेल्वे रूळांच्या दोन हजार फूट परिसरात वाळू उत्खनन होऊ नये म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन १४ मार्चपर्यंत रेल्वे रूळ परिसरात वाळी उत्खननास बंदी घातली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order prohibits illegal sand mining within 600 meters of thane and kalyan railway tracks until march 14 sud 02