दहा हजार विद्यार्थ्यांना महापालिका शाळांत सामावून घेणार
ठाणे महापालिका शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या ६४ अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले असून त्यानुसार शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे. या शाळेतील दहा हजार विद्यार्थ्यांना महापालिका शाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. मात्र या शाळेतील ४९७ शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच दिवा भागात अनधिकृत शाळा सुरू असून अशा शाळांची यादी महापालिका शिक्षण विभागाकडून दरवर्षी जाहीर करण्यात येते. अशा शाळांची यादी गेल्यावर्षी जून महिन्यात शिक्षण विभागाने जाहीर केली होती. त्यामध्ये वागळे इस्टेट, राबोडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील ६४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. या शाळा बंद करण्यासंबंधीचे पत्र लोकायुक्तांनी शिक्षण विभागाला दिले असून त्याआधारे या विभागाने नोटीस बजावून शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ६४ अनधिकृत शाळा असून त्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या ५१ शाळा आहेत. तर मराठी माध्यमाच्या तीन आणि हिंदी माध्यमाच्या १० शाळा आहेत. या शाळांमध्ये ४९७ शिक्षक आहेत.
या संदर्भात शिक्षण विभागाचे सभापती विकास रेपाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तसेच अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिका शाळांमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शाळांमध्ये १० हजार २६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
..अन्यथा गुन्हे दाखल
ठाणे महापालिका शिक्षण विभागाने ६४ अनधिकृत शाळांना दोनदा नोटीस बजावली असून त्यात शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या शाळा सुरू आहेत. असे असतानाच या शाळा बंद करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिल्यामुळे शिक्षण विभागाने गुरुवारी एक बैठक घेतली. या शाळांना अखेरची नोटीस पाठवली.