भरधाव वाहनचालकांना लगाम बसावा आणि वेगामुळे होणारे अपघात टळावेत, या उद्देशातून महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर गतिरोधक बसविले आहेत. मात्र, गतिरोधक योग्य पद्धतीने करण्यात आले नसल्यामुळे ठाणेकरांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर रस्त्यावरील गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने बसविण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे शहरातील विविध रस्त्यांलगत शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळे असून येथे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. यामुळे या भागात वाहनांच्या वेगाला प्रतिबंध बसावा म्हणून रस्त्यावर वाहतूक नियंत्रण विभागाच्या मार्गदर्शनाखाली गतिरोधक बसविण्यात आले. त्यापैकी बहुतेक गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आलेले नाहीत. यामुळे या गतिरोधकामुळे अपघात होऊ लागले आहेत. तसेच काही गतिरोधक उंच असल्याने तिथे कारचा खालचा भाग घासत असून यामुळे कारचालकांचे नुकसान होऊ लागले आहे. गतिरोधकावर काळे-पांढरे पट्टे व गतिरोधक दर्शक फलक असणे गरजेचे असते. मात्र, असे तिथे काहीच नसल्यामुळे वाहनचालकांना गतिरोधकाची माहिती मिळत नाही आणि अचानक समोर आलेल्या गतिरोधकावरून भरधाव वाहन उडून अपघात होतो. यामुळे हे गतिरोधक ठाणेकरांसाठी धोकादायक ठरू लागले असून यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महापौर संजय मोरे यांनी अशा प्रकारचे अपघात टळण्यासाठी शहरातील गतिरोधक वाहतूक नियंत्रक विभागाच्या मार्गदर्शन व प्रचलित नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने बसविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.