लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच मराठी देवनागरी भाषेत पाट्या नसणाऱ्यांवर कारवाई करताना सर्व आवश्यक बाबी तपासून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार आता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी त्यांनी दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून त्यांच्यामार्फत दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी (देवनागरी) लिपीत आहेत की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील म्हणजेच मराठी भाषेमध्ये निश्चित केलेल्या आकारापेक्षा लहान असू नयेत. तसेच प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरील अक्षर लेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे देखील आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची संबंधित सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही करताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी सहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ मधील कलम ३६ क नुसार ठाणे शहरातील जी दुकाने तसेच आस्थापना यांचे नामफलक मराठी देवनागरी भाषेत नसतील अशांवर कारवाई करताना सर्व आवश्यक बाबी तपासून घ्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी सहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत. तसेच सर्व दुकान मालकांनी व आस्थापनांनी अधिनियमांचे पालन करुन नामफलक मराठी देवनागरी लिपीत करुन घेवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.