पाच ते आठ क्रमांकांच्या फलाटांवर सुविधा

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी जिन्यांची चढउतार करावी लागू नये, यासाठी स्थानकातील पाच ते आठ क्रमांकांच्या फलाटांवर जैविक स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत. ही स्वच्छतागृहे पर्यावरणपूरक असल्यामुळे फलाटांवर दरुगधी पसरण्याची शक्यता नाही. येत्या १५ दिवसांत ही स्वच्छतागृहे खुली करण्यात येणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकात अपंग प्रवाशांसाठी फलाट क्रमांक दोन आणि दहा येथे स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. ठाण्याहून प्रवास करताना या प्रवाशांना जलद लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक ५ आणि ६ वर, तर लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी ७ आणि ८ या फलाटांवर यावे लागते. या फलाटांवर स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे या प्रवाशांना स्वच्छतागृहाच्या शोधात जिने चढून किंवा इतर प्रवाशाच्या मदतीने फलाट क्रमांक दोन किंवा दहा येथे जावे लागते. जिने चढ-उतर करताना या प्रवाशांचे हाल होत असत. अपंग प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी या फलाटांवर जैविक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने या स्वच्छतागृहांचे काम हाती घेतले होते. हे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

फलाट क्रमांक ५ आणि ६ वर एक, तसेच ७ आणि ८ वर एक असे दोन जैविक स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत. लवकरच ही स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी खुली होतील, अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानकाचे प्रशासकीय संचालक राजेंद्र वर्मा यांनी दिली. येत्या काळात याच स्थानकात आणखी अशी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जैविक स्वच्छतागृह

या स्वच्छतागृहाद्वारे मलाचे जैविक विघटन होऊन त्याचे पाण्यात रूपांतर होणार आहे. अशाप्रकारची स्वच्छतागृहे पर्यावरणपूरक असतात. त्यामुळे फलाटावर स्वच्छता राहणार असून दरुगधीही होणार नाही, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.

 

Story img Loader