रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनानंतर दहा वातानुकूलीत लोकल फेऱ्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असला तरी गर्दीच्या वेळेतील सर्वच वातानुकूलीत लोकल रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपुर्वी केली असून या पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या रविवारी कळवा परिसरात रेल्वे प्रवाशांची एक बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये वातानुकूलीत लोकल आणि रेल्वेच्या इतर समस्यांबाबत कोणती भुमिका घ्यायची यावर चर्चा करण्यात येणार आहे. पाऊस वारा याला न जुमानता आपल्याला आपली एकी दाखवावी लागेल, असे सांगत आव्हाड यांनी रेल्वे प्रवाशांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – कल्याण : गणेशोत्सवात मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वातानुकूलीत लोकल चालविण्यात येतात. प्रवाशांना वातानुकूलीत लोकलचा प्रवास खर्च परवडणारा नाही. या लोकलच्या फेऱ्यामुळे सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत होते. यातूनच कळवा आणि बदलापूर भागात प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर दहा वातानुकूलीत लोकल फेऱ्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला. या निर्णचा फायदा केवळ एक लाख नागरिकांनाच फायदा होणार आहे. परंतु गर्दीच्या वेळेत २५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळी अशा गर्दीच्या वेळेतील सर्वच वातानुकूलीत लोकल फेऱ्या रद्द करून त्या सकाळी ११ ते दुपारी ५ आणि रात्री १० नंतर चालवावी, अशी भुमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपुर्वी मांडली होती. हा विषय लोकांच्या मनाला भिडणारा आणि यातना देणारा आहे. वेळीच विचार करा. रेल्वेमध्ये कधीही न घडलेले आंदोलन, न भूतो न भविष्यती आंदोलन हे रेल्वे विरुद्ध मुंबईत घडेल. त्याला कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्याची गरज नाही. हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्यच तो सोडवतील. जसा कळव्यात सर्वसामान्यांनी तो सोडवला. पश्चिम आणि मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असा सुचक इशाराही आव्हाड यांनी दिला होता. त्यापाठोपाठ आता त्यांनी रविवारी दुपारी १२ वाजता कळवा येथील कावेरी सेतु परिसरात रेल्वे प्रवाशांची एक बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये वातानुकूलीत लोकल आणि रेल्वेच्या इतर समस्यांबाबत कोणती भुमिका घ्यायची यावर चर्चा करण्यात येणार आहे.

Story img Loader