ठाणे : ठाण्यासह कल्याण, डोंबिवली परिसरात दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त रविवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील तलावपाळी परिसर, राममारुती रोड, डोंबिवलीतील फडके रोड परिसर तरुणाईने भरून गेले होते. डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली.पारंपरिक पोशाखात तरुण, तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांसोबत दिवाळी पहाट कार्यक्रमास जमले होते. अनेक कलाकारांनी कार्यक्रमास हजेरी लावली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाणे, कल्याण- डोंबिवलीमध्ये अनेक राजकीय नेते, सामाजिक संस्थांच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजल्यापासूनच सर्व परिसर तरुणाईने भरून गेले होते. शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमास अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.  अभिनेत्री, सायली संजीव, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ तांबेकर, निर्मिती सावंत यांच्यासह िरकू राजगुरू आणि हिंदूी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा यांनी उपस्थित लावत चाहत्यांसमवेत गाण्यांवर ठेका धरला. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गौतमीपाटील हिने नृत्याविष्कार सादर केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून तरुणींशी संवाद साधत सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.तरुण- तरुणी पारंपरिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते. अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते.डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वानी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. नाराजीचा सूर.डोंबिवलीतील गणेश मंदिरतर्फे अप्पा दातार चौकात, एका वाहिनीतर्फे मदन ठाकरे चौकात आणि मॉडर्न कॅफे हॉटेलसमोर शिवसेनेतर्फे गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले होते. आता काही राजकीय मंडळी रस्ते अडवून तरुणाईला आकर्षित करण्यासाठी फडके रोडवर मंडप टाकत असल्याने नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>>मुंबई, पुण्यासह पाच बाजार समित्यांची झाडाझडती; सरकारचा निर्णय, शेतकरी हिताला प्राधान्य नसल्याचे उघड

मुंबई विद्यापीठात ‘दिवाळी संध्या’

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘दिवाळी संध्या’ या कार्यक्रमाचे फोर्ट संकुलातील सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. २० पेक्षा अधिक देशांतील वाणिज्य दूतांनी दीपोत्सव अनुभवण्यासह फराळाचा आस्वाद घेतला.  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमात अर्जेटिना,   चिली, चीन, फ्रान्स, जपान,  मेक्सिको, ओमान, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील वाणिज्य दूत सहभागी झाले होते. यावेळी शास्त्रीय संगीत, दीपनृत्य, भक्तिगीते, कोळीनृत्य, भावगीते सादर करून विद्यार्थी कलाकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organized diwali pahat program on sunday on the first day of diwali in kalyan dombivali area with thane amy