ठाणे महापालिका क्षेत्रात गोवरबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी या आजाराची साथ वाढू नये म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपयायोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोन महिने विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यामध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
हेही वाचा- “…म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात”, राज ठाकरेंनी केली प्रतिक्रिया व्यक्त
शहरात डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ या कालावधीत विशेष गोवर रुबेला मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबर आणि दुसरी फेरी १५ ते २५ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. गोवर रुबेला लशीची पहिली मात्रा ९ ते १२ महिने वयोगटात, तर दुसरी मात्रा १६ ते २४ महिने वयात घेणे अपेक्षित आहे. ९ महिने ते ५ वर्षाच्या बालकांचा गोवर रुबेला लशीची पहिली किंवा दुसरी मात्रा अथवा दोन्ही मात्रा राहिलेल्या बालकांना वंचित मात्रा या विशेष मोहिमेमध्ये देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. गोवर रुबेला लसीच्या कोणत्याही दोन मात्रांमधील अंतर हे २८ दिवसाचे राहिल याबाबत दक्षता घ्यावी. गोवर रुबेला लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका यांना घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- साहाय्यक आयुक्त बदलताच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात
महापालिका क्षेत्रामध्ये नोव्हेंबर २०२२ पासून गोवर रुबेला प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी सर्वेक्षण करुन ताप व पुरळ असणाऱ्या रुग्णांना शोधून त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोव्हेंबर पासून एकूण ४७ हजार ४० बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. ‘गोवर आणि रुबेलाला हरवूया ..हे लसीकरण नक्की करुया’ असे आवाहन ठाणे महापालिकेने केले असून महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रातंर्गत नियमित लसीकरण सत्रे व अतिरिक्त लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.