कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी वाहतूक विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त झेंडा वंदनानंतर कल्याण पूर्वेतील विविध रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. गणवेशामध्ये सर्व वाहतूक पोलीस अधिकारी, पोलीस दुचाकीवर स्वार होऊन संचलन करत होते.
नेहमी वाहतूक चौक, रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी गस्तीवर असलेले वाहतूक पोलीस सोमवारी दुचाकीवर एका गणवेशात संचलन करत असल्याचे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्ताच्या दुतर्फा गर्दी केली होती. कोळसेवाडी पोलीस वाहतूक शाखा, कोळसेवाडी पोलीस ठाणे, बाजारपेठ विभाग, काटेमानिवली, तिसगाव नाका, मलंग रस्ता करत दुचाकी फेरी वाहतूक शाखेजवळ समाप्त करण्यात आली.
गेल्या आठवड्या पासून कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी पोलीस कल्याण मधील विविध शाळांमध्ये जाऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक होतील अशी व्याख्याने देत आहेत. यामध्ये मोबाईलचा सदुपयोग-दुरुपयोग, दुचाकी, मोटार चालविताना घ्यावयाची काळजी. अल्पवयीन मुलाने वाहन चालविले तर दाखल होणारे गुन्हे, दंड आणि त्याचे दुष्परिणाम याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दिली. मागील आठवडाभर हा उपक्रम वाहतूक विभागातर्फे सुरू होता.
संस्कार भारतीतर्फे समुह गायन
संस्कार भारतीच्या कल्याण शाखेतील कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील साई चौकात जाऊन समुहाने वंदेमातरम गीत गायनाचा कार्यक्रम केला. देशाला स्वातंत्र मिळून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण करत गाणी गाण्यात आली. गायन कार्यक्रमात सायकल गट, माधवनगर, अब्दुल कलाम शाखेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
यावेळी संस्कार भारतीचे कल्याण जिल्हाध्यक्ष भूषण कर्णिक, प्रांत मंत्री सिध्दार्थ साठे, उमेश कुलकर्णी, ललित सारंग, अर्चना कर्णिक, सोनाली बोबडे, सानिका डोरले, राजन शुक्ल, संदीप बोबडे, गायन कार्यक्रमात अनिरुध्द मेंडकी, मानसी मेंडकी, अमर घोलप, विनोद शर्मा, प्रशांत भावसार सहभागी झाले होते. यावेळी संस्कार भारतीतर्फे वर्षभर सुरू असलेल्या स्वाधिनतासे स्वतंत्रता की और कार्यक्रमाची सांगता यावेळी करण्यात आली.
रेल्वे कर्मचारी सन्मान
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रोटरी क्लब डोंबिवली डायमंडचे पदाधिकारी, रेल्वे अधिकारी, लोहमार्ग, सुरक्षा जवान यांच्या उपस्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी करोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील सफाई कामगारांचा रोटरी क्लब डोंबिवली डायमंड्सतर्फे भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डोंबिवली स्थानक व्यवस्थापक पी. के. दास, उपस्थानक व्यवस्थापक साहू, आरपीएफ प्रमुख यादव, रोटरीचे अध्यक्ष संजय कागदे, उपप्रमुख ज्ञानेश्वर काठे, सुदीप साळवी, नीलेश गोखले, सुप्रिया कागदे, नम्रता गोखले, सुनीता रुईया, डाॅ. वंदना धाकतोडे, मनीष रुईया, उमेश स्थूल, कपील रुईया उपस्थित होते.
दावते इस्लामचे झेंडावंदन
कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागात दावते इस्लाम सामाजिक संस्थेतर्फे झेंडावंदनाचा कार्यक्रम करण्यात आला. मुस्लिम मोहल्ला भागातील नागरिक, मुले या कार्यक्रमात सहभागी झाली होती. संस्थेचे मौलना नूर अहमद यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सामान्यातल्या सामान्य घटकाचा विचार करुन देश प्रगतीच्या दिशेेने जात आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे मौलाना अहमद यांनी सांगितले.