मनशक्ती केंद्राच्या माईंड जिम विज्ञान संस्कार सोहळ्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध अनोख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदविला. माईड ट्रेनिंग उपक्रम, मानस यंत्र चाचण्या यांसह विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यासयश, पालकांसाठी विवेकी पालकत्व, तरुणांसाठी यौवनातील महत्वाकांक्षा, प्रौढांसाठी कुटुंबसौख्य, ताणव्यवस्थापन, मत्सरघात आणि वास्तूशुद्धी, मनोधैर्यासाठी ध्यान यांसारख्या विविध विषयांना हात घालणारे उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरले. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचा देखील नागरिकांनी लाभ घेतला.
हेही वाचा- ठाणे : म्हारळ नाला थेट उल्हास नदीत; फेसाळ सांडपाण्यामुळे नदी प्रदुषित
ठाण्यातील सी के पी सभागृह आणि एनकेटी महाविद्यालयाचे सभागृह या ठिकाणी पार पडलेला या चार दिवसीय मनशक्ती माईंड जिम विज्ञान संस्कार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. मनशक्ती केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या माईंड जिम विज्ञान संस्कार सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवार, ६ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ विचारवंत व स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप वासलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भारतीय संविधानात नमूद असलेल्या न्याय, समता आणि बंधुता या तीन मूल्यांचा अंगीकार करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. मात्र हक्क मिळवताना आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. माणूसकी जोपासणारी विज्ञानवृत्ती, चौकस दृष्टिकोन आणि स्वतःत सुधारणा करत चांगले बदल घडवून आणण्याची सवय मनाला जाणीवपूर्वक लावणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. तर हल्ली कर्मकांडाबद्दल उलटसुलट टीका केली जाते.
हेही वाचा- डोंबिवलीत फडके रस्त्यावर अमेरिकन नागरिकाची महिलांकडून फसवणूक
प्रत्येक संस्कार वा प्रथा म्हणजे कर्मकांड आहे असे गृहीत न धरता त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे मत सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. तर या प्रमुख पाहुण्यांच्या व्याख्यानानंतर विज्ञान सोहळ्यात आयोजित करण्यात आलेल्या तणावमुक्त अभ्यासयश, विवेकी पालकत्व, सर्वांगीण आरोग्य या विषयावर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्रात जेष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे आणि झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक निलेश खरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी प्रवीण दवणे यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्मार्टफोन देणाऱ्या आई-बाबानी मुलांच्या हातात महापुरुषांची चरित्रग्रंथ द्यायला हवीत.तरच मुलांना महापुरुषांचा समृद्ध इतिहास वाचता येईल. असे सांगत तुमच्या सामर्थ्यावर यश मिळवायला शिका, अपयश आलंच तर न डगमगता सामोरे जा असा सल्लाही त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना दिला. तर यावेळी सोशल मीडियावरचं अतिरेकी वापरावर नियंत्रण आणायला हवे, असेही स्पष्ट मत निलेश खरे यांनी यावेळी व्यक्त केले. तर या मान्यवरांच्या व्याख्यानानंतर कुटुंबसौख्य, मनोधैर्यासाठी ध्यान, मत्सरघात आणि वास्तूशुद्धी, बालकाची मेंदूक्रांती याविषयावर व्याख्यान प्रात्यक्षिके पार पडली. तर या विज्ञान सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी ९ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान नागरिक कायदा, प्रौढांसाठी सुप्रजनन – उत्तम गर्भधारणेची पूर्वतयारी या विषयवार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा- कल्याणमध्ये खडकपाडा भागात दोन टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त
मान्यवरांचा सन्मान
या विज्ञान सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी शिक्षणतज्ज्ञ रती भोसेकर, आजारी प्राण्यावर उपचार करणारे डॉ. अर्चना आणि गणराज जैन, पर्यावरण तज्ज्ञ प्रसाद कर्णिक, विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक विश्वस्त गीता सत्यजित शाह, जागृती पालक संघांचे अध्यक्ष सतीश धुरत, सिग्नल शाळेचे भटू सावंत, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.उल्का नातू, जिद्द शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्यामश्री भोसले या मान्यवरांचा ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. अशोक मोडक यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. तर भोगप्रियता, स्वच्छंदीपणा आणि संस्कृतीहीनता समाजात बोकाळली असताना भविष्याकडे आशावादीपणे पाहण्याची दृष्टी मनशक्तीने आपल्या अभ्यास- संशोधनकार्यातून दिली आहे. या शब्दांत डॉ. अशोक मोडक यांनी मनशक्तीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, जेष्ठ साधक सुधाकर पाठक उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर ‘मनाचा विकास आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील विवेचन पार पडले. तर १२ वर्षवरील मुलांसाठी मेंदूविकास प्रात्यक्षिके पार पडली.