ठाणे : ठाण्यातील राम मारुती रस्त्यावर सन १९९७ मध्ये सुरु झालेले मॅजेस्टिक बुक डेपोला २५ वर्ष पूर्ण होत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅजेस्टिकतर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलाखत, गप्पा आणि ग्रंथ प्रदर्शनाचा सामावेश असून हे सर्व कार्यक्रम १ ॲाक्टोबर ते ५ ॲाक्टोबरच्या कालावधीत सायंकाळी ७ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात होणार आहे.
सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरात मॅजेस्टिकने आपले सुसज्ज, प्रशस्त ग्रंथदालन सुरु केले. या ग्रंथदालनास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेले २५ वर्ष या ग्रंथदालनास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात १ ॲाक्टोबर ते ५ ॲाक्टोबर या कालावधीत होणार आहे.
यामध्ये १ ॲाक्टोबर रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांची मुलाखत होणार आहे. दशकातले लेखक गणेश मतकरी आणि ह्रषीकेश गुप्ते यांची मुलाखत २ ॲाक्टोबर रोजी पार पडणार आहे. तर, फेसबुक ग्रुप काय करतात या विषयावर विनम्र भाबळ, भक्ती चपळगावकर, गुरुदत्त सोनसुरकर हे उपस्थितांना ३ ॲाक्टोबर ला मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची मुलाखत ४ ॲाक्टोबर रोजी होणार आहे. तसेच ५ ॲाक्टोबर रोजी गायक सुदेश भोसले यांची मुलाखत पार पडणार आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. या पाच दिवसाच्या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत वाचकांसाठी ग्रंथप्रदर्शनही भरविण्यात आले आहे.
मॅजेस्टिकचा इतिहास
ठाण्यातील राम मारुती रस्त्यावर सन १९९७ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर जेव्हा मॅजेस्टिकचे ग्रंथदालन सुरु केले. त्यावेळी पहिले सात दिवस लेखक स्वाक्षरी समारंभ केला होता. प्रिया तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, दिलीप प्रभावळकर, रत्नाकर मतकरी हे साहित्यिक स्वाक्षरी देण्यासाठी मॅजेस्टिकमध्ये आले होते. या उपक्रमामुळे ठाण्यात मॅजेस्टिक बुर डेपो सुरु झाला आहे, अशी बातमी ठाण्यातच नाहीतर, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, वाशीपर्यंत पोहोचली. परंतू, अनेकांना हे काही दिवसाचे पुस्तक प्रदर्शन आहे असे वाटले होते. कारण, तेव्हा मॅजेस्टिकसारखे पुस्तकांचे दुकान मुंबई- ठाण्यात नव्हते. लेखक प्रकाशकानुसार मांडणी केलेले बुक रॅक्स, प्रशस्त जागा आणि अनेक विषयांवरील नवी – जुनी पुस्तके जी चाळता येत होती. त्यामुळे वाचकांच्या रुढ कल्पनेतील पुस्तकांच्या दुकानांपेक्षा वेगळाच अनुभव होता. हे कायमस्वरुपी पुस्तकांचे दुकान असून हे इथेच राहणार आहे. याची खात्री पटवण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले. शाळा-शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साहित्यविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना मॅजेस्टिकच्या दुकानाचे ठिकाण समजले. अशाप्रकारचे वेगवेगळे उपक्रम मॅजेस्टिकतर्फे नेहमी राबविण्यात येत होते. त्यामुळे मॅजेस्टिकला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
हेही वाचा : मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक
मॅजेस्टिकचे ग्रंथदालन हे अनोख्या पद्धतीचे आहे. पूर्वी ठाण्यात अशाप्रकारचे पुस्तकांचे दुकान नव्हते. त्यामुळे सुरुवातीला वाचकांनाही हे पुस्तकांचे दुकान आहे, हे समजायला फार वेळ लागला. यासाठी विविध उपक्रम राबविले होते. तेव्हा मॅजेस्टिकची ओळख वाचकांना झाली. त्यानंतर, वाचकांचा प्रतिसाद वाढत गेला. यंदा या ग्रंथ दालनाला २५ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. – अशोक कोठावळे, संचालक, मॅजेस्टिक प्रकाशन