ठाणे : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिन्ही मात्रा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५३ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रुपाली सातपूते यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण सत्रामध्ये प्रथम, व्दितीय आणि वर्धक मात्रा करिता पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. या विशेष लसीकरण सत्रात १५३ कर्मऱ्यांना लस देण्यात आली. तसेच या सत्रात जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रुपाली सातपुते यांनी उपस्थित राहून करोना लशीची वर्धक मात्रा घेतली. यावेळी सर्व जिल्हा परिषद कर्मचारी तसेच ठाणे जिल्ह्यातील लसीकरणास पात्र असलेल्या नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक लशीची प्रथम, व्दितीय आणि वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.