देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या स्तरावर राबविण्यात येणार असून याअंतर्गत प्रभात फेरी, चित्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, ऐतिहासिक स्थळांना भेटी यांसारख्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व उपक्रम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि स्थानिक प्रशासनाला राबविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मागील वर्षभरापासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यात विविध महाविद्यालये, शाळांमध्ये स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, सायकलोक्थॉन, मॅरेथॉन, प्रभात फेरी, चित्र प्रदर्शन, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ठिकाणी पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या बाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, पोलीस विभागाने या महोत्सवात आखून दिलेले कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावे. या महोत्सवात नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ ठोंबरे यांनी केले आहे.