वर्तकनगर परिसरातील आश्रमशाळेत नंदिनी जाधव दाखल झाली, तेव्हा ती जेमतेम पाच वर्षांची होती. आश्रमशाळेतल्या अन्य मुलींप्रमाणे आपल्यालाही आईबाबा नाहीत, या धारणेनेच तेथील जीवनात ती रुळली, शाळेत जाऊ लागली. पण, ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने पाच वर्षांनंतर तिच्या खऱ्या आईचा शोध लावला आणि दारिद्रय़ाने गांजलेल्या एका कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी समोर आली.
वर्तकनगर परिसरातील या आश्रमशाळेत २४ मुली शिकतात. यातील बहुतांश मुली घरातून हरवल्यानंतर येथे दाखल करण्यात आल्या आहेत. या मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटतर्फे करण्यात येते. याच आश्रमशाळेत राहणारी नंदिनी जाधव या मुलीच्या पालकाचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कमालुद्दीन शेख यांच्या पथकातील हवालदार प्रतिमा मनोरे आणि पोलीस नाईक रोहिणी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली. दहा वर्षांची नंदिनी सध्या पाचवीत आहे. त्यानुसार या पथकाने तिच्या जन्मदाखल्याचा छडा लावला आणि त्यावर नोंद असलेल्या घरच्या पत्त्यावरून घणसोलीतील एक घर गाठले. मात्र, तेथे नंदिनीचे पालक सापडले नाहीत. परंतु, तिची आई काम करीत असलेल्या ऐरोलीतील रुग्णालयाचा पत्ता मिळाला. तेथे जाऊ चौकशी केली असता, नंदिनीच्या आईने तेथील काम काही महिन्यांपूर्वीच सोडल्याचे उघड झाले. तेथील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने या पथकाने नंदिनीच्या आईचे दिघा येथील घर गाठले. मात्र, तिला आपली खरी ओळख न सांगता उपचारासाठी नर्स पाहिजे, असल्याचे भासवत तिची चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान, आपली मुलगी आश्रमशाळेत असल्याचे तिने मान्य केले. पतीचे निधन झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मुलीचे संगोपन करणे अशक्य झाल्याने तिच्या भवितव्याचा विचार करून आपण एका मैत्रिणीच्या मदतीने तिला आश्रमशाळेत सोडल्याचे सांगताच पथकातील पोलिसांचे मनही हेलावून गेले.
आता नंदिनीचा ताबा घेण्याचे तिच्या आईने मान्य केले आहे. दोन महिन्यांत नंदिनीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.  

Story img Loader