केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी मूल दत्तक प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी ऑनलाइन पद्धत अमलात आणण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याला अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्थाचालकांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भातील आपल्या भावना केंद्र सरकारला कळवण्यासाठी येत्या २० आणि २१ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या वतीने एक सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत संस्थाचालक ऑनलाइन दत्तक प्रक्रियेला विरोध दर्शवणारा ठराव संमत करणार आहेत. या सभेला देशभरातील ५५० संस्था जमणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाने या पद्धतीवर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. याच वेळी संस्थाचालकांना ऑनलाइन दत्तक मूल प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे येथील सुमारे १७ संस्था चालकांनी एक फेडरेशन तयार केले असून या योजनेला त्यांचा विरोध आहे. बाळाची निवड क्लिक करून करणे हे बाळाच्या भवितव्याच्या दृष्टीने अयोग्य असून आमच्या फेडरेशनचा याला ठाम विरोध असणार आहे. आम्ही आमची भूमिका नवी दिल्ली येथे मांडणार आहोत. आमची भूमिका लक्षात न घेतल्यास १७ संस्थांचे सदस्य केस वर्कर (समुपदेशक) पदाचा राजीनामा देण्याच्या विचारात आहोत, असेही काही संस्थांनी सांगितले. डोंबिवली येथील जननी आशीष संस्थेशी याविषयी विचारणा केली असता त्यांनी सभेनंतरच या विषयावर बोलणे योग्य होईल असे सांगितले. संस्थेकडे सध्या ४० पालकांची प्रतीक्षा यादी आहे.
अशी आहे प्रक्रिया
’मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
’छायाचित्रावर क्लिक् करून बाळ निवडायचे आहे.
’अनाथाश्रम संस्था घरापासून जवळ आहे, त्या संस्थांची नावे अर्जात नमूद असतील.
’अर्ज भरल्यानंतर संस्थेतर्फे तीन बाळांचे फोटो ऑनलाइन दाखवले जातील.
केवळ छायाचित्र पाहून बाळाची निवड करणे अयोग्य आहे. छायाचित्र आणि प्रत्यक्ष मूल यात बराच फरक असतो. ऑनलाइन प्रक्रियामुळे संस्थाचालकांची जबाबदारी केवळ ‘काळजीवाहू’ची (केअर टेकर) इतकीच राहील. दत्तक देण्याआधी मुलाचे मनपरिवर्तन करावे लागते. त्याचे भावी आई-वडील कोण असतील, त्यांचा परिचय त्या मुलाला काही प्रमाणात करावा लागतो. ऑनलाइन पद्धतीत यातील काहीच करता येणार नाही.
– सामाजिक कार्यकर्ता