अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च

पोर्तुगिजांच्या कालखंडात १५७५ मध्ये पहिल्यांदा या चर्चची बांधणी करण्यात आली. पोर्तुगीज सरदार बाल्ताझार गोम्स याला भाईंदर गाव बक्षीस म्हणून देण्यात आले होते. बाल्ताझार यांचा दोन वर्षांचा मुलगा अंताओ दे नाझरेथ हा अचानक आजारी पडला. त्याच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी भाईंदरमधील आपल्या जमिनीपैकी काही जमीन चर्चसाठी देऊन त्यावर स्वखर्चाने चर्च बांधेन असा त्याच्या पालकांनी नाझरेथ माऊलीला नवस केला. मुलगा बरा झाल्यानंतर १५७५ मध्ये त्यांनी नाझरेथ माऊलीच्या नावाने याठिकाणी चर्च उभारले आणि नंतर ते फ्रान्सिस्कन धर्मगुरूच्या स्वाधीन केले असा या चर्चच्या स्थापनेमागचा इतिहास आहे. अंताओ दे नाझरेथ गोम्स मोठा झाल्यानंतर तो धर्मगुरू झाला आणि अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चमध्ये रेक्टर म्हणून त्याची १५९५ मध्ये नियुक्ती झाली. चर्चचा पाया रचणारे फादर सायमन दे नाझरेथ हे या चर्चचे पहिले धर्मोपदेशक होते. बाल्ताझार गोम्स दरवर्षी चर्चसाठी २०० पर्दाओस (भारतातले पोर्तुगीज चलन) चर्चला मदत म्हणून देत असे. त्यावेळी चर्चचा आकार १०० फूट लांब आणि ५२ फूट रुंद तसेच २० फूट उंच असा होता. त्याकाळी भाईंदरमधील ५४० कॅथलिक कुटुंबांचा या चर्चमध्ये समावेश होता. त्याकाळी दररोज केवळ सकाळीच मिस्सा अर्पण केला जायचा.

पुढच्या काळात चर्चच्या वास्तूत बरेचसे बदल घडत गेले. १८९० मध्ये फादर मायकेल फुर्टाडो यांनी चर्चच्या वास्तूचा पहिल्यांदा विस्तार केला. त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजेच १९१० मध्ये चर्चची पुनर्रचना फादर जोसेफ घोन्साल्वीस यांनी केली. १९३७ मध्ये चर्चच्या इमारतीची संपूर्ण पुनर्बाधणी करण्यात आली. आता ज्या रूपात चर्चची इमारत उभी आहे त्याची पुनर्बाधणी १९९१ मध्ये फादर साल्वाडोर रॉड्रिग्ज यांनी केली. यावेळी चर्चच्या पवित्र वेदीचे नूतनीकरण करून कार्डिनल सायमन पिमेंटा यांच्या हस्ते ती आशीर्वादित करण्यात आली. चर्चच्या पवित्र मंदिरात मुख्य वेदीवर येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे आणि वेदीच्या उजव्या बाजूला पाश्चात्य शैलीने तयार करण्यात आलेला आणि सोन्याचा मुलामा दिलेला नाझरेथ माऊलीचा पुतळा आहे. १९५० पर्यंत या चर्चमध्ये विजेची सुविधा नव्हती. त्यावेळी केरोसीनवर चालणाऱ्या तीन पेट्रोमॅक्सच्या मदतीने चर्च प्रकाशमान केले जायचे. एका पेट्रोमॅक्सने पवित्र वेदी उजळली जायची आणि उर्वरित दोन पेट्रोमॅक्सने संपूर्ण चर्च उजळले जायचे. हे चर्च पूर्व दिशाभिमुख आहे. सध्या या चर्चमध्ये फादर आन्सेल्म घोन्साल्वीस हे प्रमुख धर्मगुरू असून फादर अ‍ॅन्थनी बॅन्झ आणि फादर किनालिया डिसोजा हे त्यांचे साहाय्यक म्हणून काम करतात.

धर्मकार्यासोबतच अनेक सामाजिक कार्यही चर्चच्या माध्यमातून पार पाडले जाते. संत विन्सेंट डी पॉल संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आजारी व्यक्तींच्या औषधोपचाराचा खर्च तसेच गरीब कुटुंबांच्या मासिक अन्नधान्याचा खर्च केला जातो.  लहान मुलांपासून ते वरिष्ठ नागरिक, महिला अशा प्रत्येकासाठी चर्चने स्वतंत्र गट स्थापन केले असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृतीचे संवर्धन, तरुणांसाठी प्रबोधन, विविध खेळांच्या स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, महिलांच्या सबलीकरणासाठी आणि आरोग्यासाठी विविध उपक्रम, वरिष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, योग वर्ग आदी विविध प्रकारचे उपक्रम पार पाडले जातात तसेच उपवासकालीन दिवसांमध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन करणारे विविध तज्ज्ञ पाचारण करून त्यांच्या माध्यमातून व्याख्याने आयोजित केली जातात. परिसरातल्या विविध आश्रमांना भेटी देऊन तेथील गरिबांना चर्चकडून आर्थिक तसेच अन्नधान्याची मदत केली जाते. याव्यतिरिक्त चर्चची इंग्रजी माध्यमाची शाळा असून त्यात विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.