ठाणे : आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ठाणे जिल्ह्यातून १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतू, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ ३ हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली का अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दुरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाही असा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.

वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्रवेश अर्ज स्विकारण्याची मुदत २ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार, १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मिळूनही आतापर्यंत केवळ ३ हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांचा प्रवेश कागदपत्रांच्या त्रुटी अभावी नाकारण्यात आला असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

शिक्षण विभागाचे म्हणणे…

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी तारिख, वेळ, ठिकाण याची माहिती पालकांना संदेशाद्वारे दिली जात आहे. परंतू, पालकांचे या संदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काही पालक प्रवेश निश्चित करण्यासाठी अद्याप आलेले नाहीत, असा दावा प्राथमिक शिक्षणविभागाकडून करण्यात आला आहे. तसेच ज्या बालकांची आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झाली आहे. पण, त्यांचा प्रवेश निश्चित झालेला नाही, अशा बालकांच्या पालकांना दुरध्वनीवर संपर्क साधून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणविभागाकडून आवाहन केले जाणार आहे. त्यासह, प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देणार असल्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

Story img Loader