ठाणे: ठाणे महापालिकेत सात सहायक आयुक्तांची राज्य शासनाने नियुक्त केली असून त्यापैकी केवळ चारजण ठाणे महापालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. उर्वरित तीन सहायक आयुक्त अद्यापही हजर झालेले नाहीत. सद्यस्थितीत महापालिकेत राज्य शासन नियुक्त एकूण पाच तर, महापालिकेचे दोन असे एकूण सात सहायक आयुक्त कार्यरत आहेत. यामुळे पालिकेत मंजुर असलेल्या १८ पैकी ११ सहायक आयुक्त पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे.ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची एकूण १८ पदे आहेत.
पालिकेच्या विविध विभागांसह प्रभाग समित्यांची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर असते. गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या प्रभाग समित्यांवर पालिका तसेच शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत. मात्र, एक ते दिड वर्षांमध्ये पालिकेचे काही सहाय्यक आयुक्त सेवा निवृत्त झाले तर, शासन नियुक्त सहाय्यक आयुक्तांची इतरत्र बदली झाली. त्यांच्या जागी शासनाने नवीन सहाय्यक आयुक्तांची नेमणुक केली नव्हती. यामुळे पालिका प्रशासनाने विविध विभागांसह प्रभाग समित्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक तसेच उपअधिक्षक असलेल्या अधिकाऱ्यांकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार दिला होता.
दरम्यान, सहाय्यक आयुक्त उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. ही मागणी मान्य करत राज्य शासनाने ठाणे महापालिकेला एकाच वेळेस सात सहाय्यक आयुक्त उपलब्ध करून दिले आहेत. चार सहायक आयुक्तांची नियुक्तीदिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पदी शिवप्रसाद नागरगोजे, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पदी विजय कावळे, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पदी सोमनाथ बनसोडे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पदी सोनल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी या प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यालयीन अधिक्षक तनुजा रणदिवे, कार्यालयीन उपअधिक्षक स्मिता सुर्वे आणि ललिता जाधव यांच्याकडील सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे.
सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी नसल्यामुळे कार्यालयीन अधिक्षकांकडे जबाबदारी
ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्याकडे उथळसर समितीच्या सहायक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र गिरी यांच्याकडे दिवा प्रभाग समितीचा सहायक आयुक्त पदाचा पदभार काढण्यात आला असून त्यांच्याकडे कळवा प्रभाग समिती सहायक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र पालिकेने पुन्हा नव्याने आदेश काढत त्यात राजेंद्र गिरी यांची नियुक्ती रद्द करून त्यांची दिवा प्रभाग समिती कार्यालयीन अधिक्षक पदावर नियुक्ती केली तर, उप कार्यालयीन अधिक्षक ललीता जाधव यांच्याकडे कळवा प्रभाग समिती सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार पुन्हा देण्यात आला.