ठाणे : सुरुवातीला तांत्रिक अडचणी तसेच जनजागृती अभावी लेक लाडकी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकली नव्हती. याची दखल घेत तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासह गावागावांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवून ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास जिल्हा परिषदेला आता यश आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात या योजनेसाठी पात्र ठरलेल्या २ हजार ८९८ लाभार्थ्यांपैकी २ हजार ८१० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. तर, उर्वरित ८८ लाभार्थ्यांनाही येत्या काही दिवसात लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात आली.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून १ एप्रिल २०२३ पासून राज्य शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे आणि बाल विवाह रोखणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. परंतू, २०२३ ला योजना सुरु होऊन सुद्धा सुरुवातीच्या पहिल्या वर्षात योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले होते. अर्ज भरताना येत असलेल्या विविध अडचणी तसेच गावागावांमध्ये जनजागृतीचा अभावामुळे ठाणे जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले होते.
हेही वाचा…ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
परंतू, याची दखल घेत या योजनेची लाभार्थी संख्या वाढावी यासाठी जिल्ह्यातील गावागावांत मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली. तसेच तांत्रिकदृष्ट्या येत असलेले अडथळे देखील दुर केले. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील २ हजार ८१० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यास जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे.
हेही वाचा…दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश
ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे १ हजार १५६ मुलींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ ५६१ मुली या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. परंतू, त्यानंतर गावागावांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडे २ हजार ९७२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ८९८ अर्ज पात्र ठरले. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी २ हजार ८१० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. तर, उर्वरित ८८ जणांना लवकरच लाभ मिळणार आहे. तसेच अपात्र ठरलेले ७४ अर्ज पूर्ततेसाठी परत पाठवण्य़ात आली असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.