ठाणे : आरटीईची दुसऱ्या प्रतिक्षा यादीची मुदत नुकतीच संपली आहे. या प्रतिक्षा यादीत ९५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ४३० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आरटीई प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी खासगी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १४ जानेवारीपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यातून ११ हजार ३२२ जागांसाठी २५ हजार ७७४ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६ हजार ७०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यानंतर, उर्वरित जागांसाठी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या प्रतिक्षा यादीत २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी १ हजार १८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, दुसऱ्या प्रतिक्षा यादीत ९५५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यापैकी ४३० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वेळा प्रवेशासाठी मुदत वाढ देऊनही अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

पालक संदेशाकडे दूर्लक्ष करत असल्यामुळे अद्याप प्रवेश पूर्ण झालेले नाही असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. दहा हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश ठाणे जिल्ह्यातील ६२७ शाळा आरटीईसाठी पात्र आहे. या शाळेतील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीईचे अर्ज मागवण्यात आले होते. जिल्ह्यातून २५ हजार ७४४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातून, केवळ ८ हजार ३२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशी माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.