नौपाडय़ातील ‘शरद दर्शन’चा इतरांसमोर आदर्श
दगडविटांनी बनलेल्या भिंतींना काळानुरूप भेगा पडून कमकुवत झालेल्या इमारतींना मालक-भाडेकरू वादाची वाळवी लागली की इमारतीचा जीर्णोद्धार कायमस्वरूपी रखडतो. एके काळी मुंबई-ठाण्यात नांदलेल्या लोभस चाळ संस्कृतीची ही शोकांतिका किमान आपल्या वाटय़ास येऊ नये म्हणून ठाण्यातील ‘शरद दर्शन’ या पन्नास वर्षे जुन्या इमारतीतील भाडेकरूंनी पुनर्विकासात मालकास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले असून धोकादायक अवस्थेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या ठाण्यातील इतर हजारो इमारतींनीही हाच मार्ग अनुसरावा म्हणून जनजागृती सुरू केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या हजारहून अधिक आहे. अपुरा एफएसआय आणि भाडेकरूंचा हक्क यामुळे व्यावहारिक गणित जुळत नसल्याने या इमारतींचा विकास खुंटला आहे. नौपाडय़ातील ब्राह्मण सोसायटीतील शरद दर्शन ही इमारतही त्यांपैकी एक. भगवंत लक्ष्मण लोहोकरे यांनी १९६२ मध्ये ही इमारत बांधली. या दुमजली इमारतीत एकूण १४ भाडेकरू असून त्यापैकी फक्त सात बिऱ्हाडे सध्या इमारतीत राहत आहेत. उर्वरितांनी दाराला कुलपे लावून आता अन्यत्र संसार थाटले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात नौपाडय़ातील कृष्णकुंज इमारत पडून जीवितहानी झाल्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील अशा संभाव्य धोकादायक इमारतींना नोटिसा पाठविल्या. त्यात शरद दर्शन इमारतीचाही समावेश होता. जुन्या ठाण्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या इमारतीवर खरे तर शहरातील अनेक नामांकित विकासकांचे फार पूर्वीपासून लक्ष आहे. मालकांना त्यांनी तशा ऑफर्सही दिल्या आहेत. मात्र इमारतीतील सात खोल्यांमध्ये राहणारे बहुतेक जण ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे गेल्या ५० वर्षांचा शेजार असलेल्या भाडेकरूंना असे वाऱ्यावर सोडून देण्यास शरदचंद्र लोहोकरे तयार नाहीत. या सात भाडेकरूंसह इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. इमारतीला नोटीस आल्यावर त्यांनी सर्व भाडेकरूंना एकत्र बोलावून त्यांच्यापुढे हे विचार मांडले. तेव्हा सर्व सातही कुटुंबांनी मालकासोबत इमारतीच्या भवितव्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने नेमलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटरकडून त्यांनी इमारतीचे परीक्षण करून घेतले. तो अहवाल महापालिकेला सादर केल्यानंतर आता लवकरच इमारतीची आराखडय़ाबरहुकूम दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे इमारतीचे आयुष्य किमान पाच वर्षांनी वाढणार आहे. या दुरुस्तीच्या खर्चात सर्व भाडेकरूंनी वर्गणी काढून मालकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवायआता कालबाह्य़ झालेले १५० रुपये मासिक भाडे वाढवून दरमहा प्रति चौरस फूट दहा रुपये देण्याचेही ठरविले आहे.
शरद दर्शनमधील सात घरे सध्या बंद अवस्थेत आहेत. वर्षांनुवर्षे या घरांत कुणीच राहत नसल्याने देखभालीअभावी त्या भागात इमारतीची अधिक पडझड झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांनी हक्क सोडण्याची तयारी दाखवली असून उर्वरितांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती शरदचंद्र लोहोकरे यांनी दिली.

संघर्षांपेक्षा संवादाने प्रश्न सुटेल
कोणत्याही परिस्थितीत मालकासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या शरद दर्शनमधील सात भाडेकरूंनी आता ठाण्यातील अशाच प्रकारच्या इतर इमारतींमधील रहिवाशांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी अशा इमारतींची यादी महापालिकेकडून मिळवली आहे. मालक-भाडेकरू वाद संघर्षांपेक्षा संवादाने सुटू शकतो, हे स्वउदाहरणाने ते पटवून देत आहेत. वयाची किमान साठी पार केलेल्या या सेवानिवृत्त भाडेकरूंनी आतापर्यंत शंभरेक इमारतींतील रहिवाशांशी संपर्क साधला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती इमारतीतील भाडेकरू शिल्पा शृंगारपुरे यांनी दिली.