वैमानिकांसाठी असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती भाईंदरमध्ये
लष्करी विमाने किंवा हेलिकॉप्टरच्या वैमानिकांना आपत्कालीन परिस्थितीत किंवा संकटकाळी बाहेर उडय़ा माराव्या लागतात. अशा वेळी त्यांना प्राणवायू मिळावा यासाठी त्यांच्या आसनाखाली छोटे ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यात आलेले असते. बाहेर पडताना वैमानिक हे सिलिंडर घेऊनच बाहेर पडतो, ज्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. विशेष म्हणजे हे ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याचे काम भाईंदरमध्ये होत आहे. भाईंदरमधील एक उद्योजक लढाऊ विमानांमधील या सिलिंडरचा निर्माता आहे.
लष्कराच्या ताफ्यात पूर्वी विदेशी बनावटीची लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर यांचा समावेश असायचा. मात्र लष्करासाठी संपूर्ण स्वदेशी बनावटीची विमाने आणि हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही विमाने व हेलिकॉप्टर आता भारतातच आकाराला येत आहेत. या विमान व हेलिकॉप्टरला वैमानिकांसाठी असलेला ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याचे काम भाईंदरमधील उद्योजक विजय पारेख करत आहेत. त्यांच्या अल-कॅन एक्स्पो या कारखान्यात हे सिलिंडर तयार होत आहेत.
पारेख यांच्या कारखान्यात घरगुती उपयोगात येतील अशा आकाराचे ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याचे काम २००४ पासून करत आहेत. हे सिलिंडर तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्फोटके विभागाची परवानगी घ्यावी लागते. अथक प्रयत्नांनंतर पारेख यांना ही परवानगी मिळाली. तेव्हापासून त्यांचा या विभागाशी सातत्याने संपर्क होता. २०१० मध्ये संपूर्ण स्वदेशी बनावटीची लढाऊ विमाने बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या विमानांमधून सर्वच भाग स्वदेशी बनावटीचे असतील. त्यामुळे वैमानिकांसाठी ऑक्सिजन सिलिंडर देशातच तयार करण्याचे नक्की झाले. लष्कराच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्फोटके विभागाकडे छोटे ऑक्सिजन सिलिंडर बनविणाऱ्या उत्पादन कंपनीची चौकशी केली. त्या वेळी पारेख यांच्या अल-कॅन एक्स्पो या कंपनीची शिफारस करण्यात आली. लष्कराच्या तज्ज्ञांनी पारेख यांच्या कारखान्याची पाहाणी केली आणि सिलिंडर तयार करण्याचे आराखडेही दिले. हे सिलिंडर लष्करी दर्जाचे तयार करायचे असल्याने अनेक चाचण्या, तपासण्या करण्यात आल्यानंतर अखेर लष्कराने पारेख यांना सिलिंडर तयार करण्याची अनुमती दिली आहे. पारेख यांनी यासाठी भाईंदरसह तलासरी येथे यासाठी अत्याधुनिक कारखाना सुरू केला असून तिथे ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. लष्करासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद विजय पारेख यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या कामाकडे आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत नसून याद्वारे देशसेवेची एक चांगली संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ऑक्सिजन सिलिंडरच्या निर्मितीमागची कल्पना
काही वर्षांपूर्वी पारेख यांच्या कारखान्यासमोरच असलेल्या एका कारखान्याला आग लागली होती. त्या वेळी आग लवकर आटोक्यात आली. दोन कामगारही थोडय़ा प्रमाणात भाजले होते; परंतु या कामगारांचा मृत्यू भाजल्यामुळे नाही, तर वेळेवर प्राणवायू न मिळाल्याने झाला. ही बाब पारेख यांच्या मनात खोलवर रुतून बसली होती. त्यानंतर ते अमेरिकेला त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असता त्यांचे काका घरात असलेल्या छोटय़ा ऑक्सिजन सिलिंडरने स्वत:च ऑक्सिजन घेत असल्याचे त्यांनी पाहिले. असे सिलिंडर तयार करण्याचा ध्यास पारेख यांनी घेतला आणि अनेक प्रयत्न व कठोर परिश्रमातून त्यांनी हे यश मिळविले.