उल्हासनगरः उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात स्वतःची प्राणवायू निर्मिती यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपासून याचे काम सुरू होते. या यंत्रणेमुळे रूग्णालयात कधीही प्राणवायुचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच वर्षाकाठी येणारा सुमारे २२ लाखांचा खर्चही वाचणार आहे. या केंद्राची प्राणवायू निर्मिती क्षमता ६ हजार लीटर प्रतिदिन असून त्यामुळे बाहेर कोणत्या रूग्णालयाला आवश्यकता असल्यास त्यांना प्राणवायू उपलब्ध करून देता येणार आहे.
करोना काळात दुसऱ्या लाटेत अत्यावश्यक असलेला प्राणवायू मिळवण्यासाठी यंत्रणा, रूग्णालये आणि लोकप्रतिनिधींनी मोठी धावपळ करावी लागल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी प्राणवायूचे टँकर आपल्या रूग्णालयाकडे वळवून घेतल्याचे प्रकारही समोर आले होते. अनेक प्राणवायू निर्मिती कंपन्यांमध्ये थेट लोकप्रतिनिधी जाऊन टँकर मिळवताना दिसत होते. त्यामुळे या टँकरचा प्रवास पोलीस सुरक्षेत करण्याची वेळ आली. त्यानंतर रूग्णालयांमध्येच प्राणवायू निर्मितीची यंत्रणा उभारण्यात आली. कल्याणजवळील सावद येथे भव्य कोविड उपचार केंद्र उभारण्यात आले होते. या उभारण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्रात प्राणवायू निर्मिती यंत्रणासुद्धा बसवण्यात आली होती. कालांतराने हे केंद्रात प्राणवायुची गरज संपली. त्यामुळे ही यंत्रणा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात स्थलांतरीत करण्यात आली होती, अशी माहिती उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे. ती यंत्रणा आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. येथे हवेतून प्राणवायू मिळवला जातो. दिवसाला २० मोठे सिलेंडर भरतील इतकी क्षमता या यंत्रणेची आहे असेही बनसोडे यांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात यापुढे बाहेरून प्राणवायू सिंलेंडर आणण्याची गरज पडणार नाही. प्रतिदिन ६ हजार लीटर प्राणवायुची निर्मिती येथे होऊ शकते. त्यामुळे रूग्णालयात थेट वाहिनीद्वारे प्राणवायू देणे सोपे होणार आहे. या प्रकल्पामुळे रूग्णालयाचे वर्षाकाठी २२ लाख रूपये वाचणार असल्याची माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली आहे.
रूग्णालय स्वयंपूर्ण, इतरांनाही मदत
या प्राणवायू प्रकल्पामुळे उल्हासनगरचे मध्यवर्ती रूग्णालय प्राणवायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. तर येथून निर्मिती होणारा प्राणवायू इतर रूग्णालयांनाही आपातकालीन वेळेत देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयत्या वेळी रूग्णालयांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.