कशिश पार्क संकुलाच्या परिसरात भातशेती, भाज्यांची लागवड

शहरे रुंदावत गेली तशी ती उंचावतही गेली. पण या सगळ्या विस्तारात निसर्ग आक्रसत गेला. शहराच्या रूपात दिसणाऱ्या काँक्रीटच्या जंगलाची आजची स्थिती पाहिली की भविष्यातील चित्र किती भयावह असेल, अशी भीती मनात दाटते. याच निसर्गरहित भविष्याचा विचार करत ठाण्यातील कशिश पार्क संकुलातील काही ज्येष्ठ नागरिकांनी परिसरातील उद्यानाच्या मागील बाजूस एक छोटेखानी शेत तयार केले आहे. या शेतात भातशेतीसोबतच विविध भाज्या, फळझाडांची लागवडही करण्यात आली आहे. आपल्या नातवंडांना शेतीची प्रक्रिया समजावी तसेच भविष्यात त्यांनाही निसर्गाचा सहवास मिळावा, यासाठी हा स्तुत्य उपक्रम या मंडळींनी राबवला आहे.

कशिश पार्क येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाच्या मागच्या बाजूला विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे तसेच भाजीचीही लागवड करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर येथे एक छोटेखानी शेत तयार करून त्यामध्ये ‘भात शेती’ही करण्यात येते. येथील बच्चेकंपनीना प्रत्यक्ष शेती कशी होते, हे या प्रयोगातून कळते. एका गुंठा जागेचा वापर करून त्यामध्ये वांगी, भेंडी, भोपळा, दुधी अशा अनेक भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. तसेच भाजीचे अळू, आमटीचा अळू, वडीचा अळू अशा तीन प्रकारच्या अळूची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर आंब्याची कलमे, लिंबू, पपनीस, नारळ, सुपारी, केळी यांसारख्या फळझाडांचाही यामध्ये समावेश आहे. वेलवर्गीयांमध्ये पडवळ, शिराळे, घोसाळे काकडी, कारले आदींचा समावेश आहे. जास्वंद, मोगरा, चाफा, डेलिया, सूर्यफूल, दुर्वा या फुलझाडांना पाहण्यासाठी बच्चेकंपनीची येथे गर्दी जमते. तसेच यंदा भुईमुगाचेही प्रायोगिक तत्त्वावर पीक घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव बलराम नाईक यांनी दिली. एवढेच नव्हे तर या भागात काही औषधी वनस्पतीही लावण्यात आल्या आहेच. त्यामध्ये कृष्ण तुळस, सामान्य तुळशींचे प्रमाण जास्त आहे.

शेतीसाठी लागणारे साहित्य त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीने दिले, तर त्यासाठी लागणारी जागा आणि माती ही महापालिकेकडून मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कृष्णा रेपाळे, अनिल कुलकर्णी, काशिनाथ माळी, बी. आर. तांबे, डॉ.बाकरे, अजित सावंत, विलास रुमडे, संजय पवार, विलास माटे, राजेश विरकर अशी मंडळी या उपक्रमामध्ये कार्यरत आहेत.

खतनिर्मितीही जागच्या जागी

शेती टिकविण्यासाठी खताची आवश्यकता असते. शेताच्या शेजारीच कंपोस्ट खत प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून जवळील उद्यानातील पालापाचोळा येथील कंपोस्ट खडय़ामध्ये टाकला जातो. त्यापासून दर तीन महिन्याला शेतीसाठी कंपोस्ट खत उपलब्ध होते. तसेच येत्या काही दिवसांमध्ये गांडूळ खत प्रकल्पही येथे सुरू होणार आहे. संघाचे राजीव वैद्य ही पूर्ण वेळ खतनिर्मितीचे काम पाहतात.

Story img Loader