कल्याण: मागील काही महिन्यांपासून बंद असलेली पडघा-खडवली रेल्वे स्थानक बस सेवा सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली. गेल्या आठवड्यात खडवली फाटा येथे झालेल्या अपघातात सहा प्रवाशांची मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रवाशांनी पडघा-खडवली बस सेवा सुरू करण्याची मागणी सुरू केली होती. मनसेचे पदाधिकारी आणि प्रवाशांच्या मागणीनंतर महामंडळाने त्याची दखल घेतली.
पडघा गावासह परिसरातील गावांमधील नोकरदार, विद्यार्थी शहापूर, मुंबई, कसाराकडे जाण्यासाठी पडघा येथून राज्य महामार्गाच्या बसने खडवली रेल्वे स्थानक येथे येत होते. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी बस प्रवासाला प्राधान्य देत होते. पडघा-खडवली मार्गावर खासगी रिक्षा, जीप इतर प्रवासी सेवा देणारी वाहने वाढली. त्यामुळे बस वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. प्रवासी संख्ये अभावी महामंडळाने या रस्त्यावरील बस सेवा स्थगित केली होती.
हेही वाचा >>> पलावा चौक येथे महिला रिक्षातून पडून गंभीर जखमी, रिक्षा चालकाचा निष्काळजीपणा
पडघा परिसरातील प्रवाशांना खडवली येथे जाण्यासाठी शेअर्स पध्दतीमधील रिक्षा, जीप, इतर खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता. रिक्षेमध्ये तीन प्रवासी आसन क्षमता असताना चालक सहा ते सात प्रवासी घेऊन प्रवास करत होता. जीप मध्ये सात ते आठ प्रवाशांना मुभा असताना जीप चालक १५ ते २० प्रवासी घेऊन प्रवास करत होता. वाढीव भाड्यासाठी चालक ही क्लृप्ती काढत होते. गेल्या आठवड्यात खडवली फाटा येथे जीपमधून चाललेल्या वाहनाला नाशिककडून आलेल्या भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली.
या धडकेत सहा प्रवासी जागीच ठार झाले. या घटनेनंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मनसेचे खडवली येथील पदाधिकारी लक्ष्मण भगत, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बेलकरे यांनी शासनस्तरावर पत्रव्यवहार करुन तातडीने खडवली फाटा येथे उड्डाण पूल उभारावा आणि या मार्गावरील बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन महामंडळाने खडवली बस सेवा सुरू केली आहे. बस सेवेचा शुभारंभ मनसेचे खडवली येथील पदाधिकारी योगेश घरत, विशाल बारणीस, राजाभाऊ लोणे, मंगेश तारमळे, दिनेश बेलकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चालक, वाहकाचा सन्मान करण्यात आला. बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना समाधान व्यक्त केले आहे.