कल्याण : तंत्रज्ञानात वेगवान प्रगती होत आहे. या गतिमानतेत सामाजिक भाव मागे पडला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव येत्या काळात लोकांमध्ये असेल की नाही अशी चिंता व्यक्त करत, पद्मश्री समाजसेवक प्रकाश आमटे यांनी सामाजिक बांधिलकी टिकविण्याचे मोठे आव्हान पुढील काळात समाजासमोर असणार आहे, असे सांगितले.कल्याणमधील याज्ञवल्क्य संस्थेतर्फे मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डाॅ. नरेशचंद्र यांना याज्ञवल्क्य पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई धारप यांना सुशीलाबाई एकलहरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, आमदार सुलभा गायकवाड, बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष ओ. पी. चितलांगे, माजी आमदार नरेंद्र पवार, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कल्याण वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षा डाॅ. सुरेखा ईटकर, याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष आ. वि. जोशी, विश्वस्त मिलिंद कुलकर्णी, राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी, निशा मांडे, प्रसन्न कापसे उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, श्रीकांत बोजेवार यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशा पुरस्कारांमुळे आपल्या कामाची महती समाजापर्यंंत पोहचते. इतरांना अशाप्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळते. आम्ही आतापर्यंत निरपेक्ष भावनेने काम केले. आदिवासी भागात आयुष्य गेल्याने आदिवासी जीवन पध्दती, त्यांच्या धर्मामुळे आमच्या जीवनात मोठा बदल झाल्याचे प्रकाश आमटे यांनी सांगितले.अलीकडच्या काळात आपल्या हेतुशी प्रामाणिक राहणे सोपे नाही. पण पुरस्कार प्राप्त व्यक्ति आपल्या कार्य, हेतुशी नेहमीच प्रामाणिक राहिल्या म्हणून त्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. दैवी देणगीमुळे दुसऱ्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा या लोकांना मिळते. आपण समाजाचे देणेकरी आहोत याची जाणीव अशा पुरस्कारांच्या माध्यमातून समाजाला मिळते, असे सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी सांगितले.
बिर्ला महाविद्यालयाचा सर्वांगीण शैक्षणिक विकास हा सर्व घटकांच्या एकत्रितपणातून झाला आहे. शहर परिसरातील प्रत्येक घरात बिर्ला महाविद्यालयातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे ही गौरवास्पद बाब आहे, असे डाॅ. नरेशचंद्र यांनी सांगितले. यावेळी ते भावुक झाले होते. मोबाईलमुळे अलीकडे मुले अभ्यासापासून दुरावली आहेत, अशी खंत विद्याताई धारप यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार स्वीकारला असला तरी आपल्या कार्यामागे अनेकांचे हात होते. त्यांचा हा सन्मान आहे, असे धारप यांनी सांगितले.